एवढं कौतुक झालं की आजुबाजुला कोणी हरभऱ्याचं झाडं लावलंय का बघत होतो- उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 08:20 PM2018-02-24T20:20:03+5:302018-02-24T20:20:03+5:30
माझं चुकत असेल तर मित्रत्त्वाच्या नात्याने आवर्जून मला सांगत जा.
सातारा: आज व्यासपीठांवर झालेल्या भाषणांच्यावेळी अनेक मान्यवरांकडून माझी खूपच स्तुती केली जात होती. तेव्हा मी आजुबाजुला कुणी एखादं हरभाऱ्याचं झाड लावलंय का, हे बघत होतो, अशी मिष्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आज साताऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये उदयनराजेंची तोंडभरून स्तुती केली. कार्यक्रमाच्या शेवटी केलेल्या भाषणात उदयनराजे यांनी विनोदी शैलीत या सगळ्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आज व्यासपीठावर अनेक मान्यवरांकडून कारण नसताना माझी स्तुती केली जात होती. त्यावेळी मी आजुबाजुला हेच पाहत होतो की, इथे कोणी हरभऱ्याचे झाड लावले आहे का? एवढं कौतुक ऐकून डायबेटीस होईल, असं वाटत होतं. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला. परंतु याच कौतुकामुळे आपल्याला काम करण्यासाठी उर्जा आणि ताकद मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले.
आपल्या भाषणादरम्यान उदयनराजे यांनी शरद पवार यांचा विशेष उल्लेख केला. आज मी पवार यांना एवढंच सांगू इच्छितो की, कधी माझं चुकत असेल तर मित्रत्त्वाच्या नात्याने आवर्जून मला सांगत जा. तुमच्या भावनेचा आणि प्रेमाचा कधी अवमान होणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असेही उदयनराजे यांनी सांगितले.
यावेळी उदयनराजेंनी श्रोत्यांना एक मजेशीर किस्साही सांगितला. यापूर्वी गांधी मैदानावर झालेल्या सभेत मी सांगितलं होतं की, ३६५ दिवस २४ तास कधीही मला हाक मारा. मी तुमच्या सेवेशी हजर आहे. त्यानंतर एकदा रात्री पावणेदोनला मला काही युवकांचा फोन आला. मी म्हणालो, काय झालंय. तर त्या युवकांनी सांगितलं की, असंच पिक्चरला आलो होतो. तुम्ही म्हणाला कधीही फोन करा म्हणून रात्री तुम्हाला कॉल केला, असं उदयनराजेंनी सांगताच पुन्हा जोरदार हशा पिकला.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, उदयनराजेंविषयी संपूर्ण देशातील खासदार मंडळींना कायमच उत्सुकता असते. ते दिल्ली कमी बोलत असले तरी जेव्हा बोलतात तेव्हा साताऱ्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल एकत्रित येऊन काय करावं लागेल, याचीच चर्चा करत असतात. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या सोबत असून यापुढेही भविष्यात आम्हा सर्वांची साथ तुम्हाला असेल, असे सूचक विधान करून भविष्यातील राजकीय घडामोडींची चुणूक शरद पवार यांनी दाखविली.