‘मुक्त’च्या ‘पीएच.डी’ला यूजीसीचा ब्रेक
By admin | Published: November 20, 2015 01:07 AM2015-11-20T01:07:14+5:302015-11-20T01:07:14+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तीनच महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या पीएच.डी च्या अभ्यासक्रमाला यूजीसीने ब्रेक लावला आहे.
- सतीश डोंगरे, नाशिक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तीनच महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या पीएच.डी च्या अभ्यासक्रमाला यूजीसीने ब्रेक लावला आहे. पीएच.डी अभ्यासक्रम पूर्णत: बंद करावा, अशा शब्दांत मुक्त विद्यापीठाला ठणकावले.
विद्यापीठाने यापूर्वी पीएच.डी पदव्या खैरातीप्रमाणे वाटल्याच्या प्रकरणामुळेच यूजीसीने हा निर्णय घेतला असून, त्याबाबत विद्यापीठाकडून लेखी हमीही घेण्यात आली आहे.
विद्यापीठात २००९ मध्ये निकष न पाळता, पीएच.डी पदवी वाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर विद्यापीठाने तांत्रिक अडचणींचे कारण देऊन, पीएच.डी बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी पदभार घेताच, पीएच.डीचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे जाहीर करीत, लागलीच पूर्ण वेळ पीएच.डी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करीत, त्यानुसार प्रवेश प्रक्रियाही राबविली. विद्यापीठाच्या मनसुब्यांवर मात्र, तीनच महिन्यांत यूजीसीने पाणी फेरले. दिल्लीत झालेल्या बैठकीत स्पष्ट शब्दांत पीएच.डी बंद करण्याचे यूजीसीने निर्देश दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून पीएच.डी चे प्रवेश घेतले जाणार नाहीत, अशी लेखी हमीदेखील घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांचे प्रवेश रद्द केले जाऊ नयेत, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. यूजीसीच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केली जात असल्याने, विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करताना, विद्यापीठाची चांगलीच दमछाक होत आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचीच पीएच.डी बंद केली नसून, देशभरातील सर्व दूरशिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची पीएच.डी बंद करण्यात आली आहे. यूजीसीच्या नव्या अॅक्टनंतर पुन्हा पीएच.डी सुरू केली जाणार असल्याचे यूजीसीने कळविले आहे.
- डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू