युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:23 AM2024-01-20T09:23:20+5:302024-01-20T09:23:37+5:30
हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही.
मुंबई : पदवी महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी आवश्यक असलेल्या युजीसी-नेट या पात्रता परीक्षेचा निकाल अखेर एक दिवसाच्या विलंबाने जाहीर झाला आहे. तांत्रिक अडणींमुळे हा निकाल लांबला होता. तसेच कटऑफही सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आली.
‘’नॅशनल टेस्टिंग एजन्सी’’ने (एनटीए) ६ ते १९ डिसेंबर, २००२३ या कालावधीत घेतलेल्या यूजीसी-नेट या परीक्षेत देशभरातून ९,४५,९१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे सात लाख मुलांनी परीक्षा दिली. देशभरातील २९२ शहरांमध्ये ८३ विषयांमध्ये यूजीसी-नेट झाली.
हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही. दि. १८ जानेवारीला रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने एनटीए ही परीक्षा घेते. यात पात्र ठरलेले उमेदवार असिस्टंट प्रोफेसर, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) याकरिता पात्र ठरले आहेत.
पुरातत्त्व शास्त्र विषयाच्या उत्तरतालिकेत (आन्सर की) अनेक त्रुटी असल्याने हा निकाल लांबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आपले लॉगइन करून पुढील संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. संकेतस्थळ - ugcnet.nta.ac.in किंवा nta.ac.in.