उगलेंना शिस्तभंगाची नोटीस

By Admin | Published: July 19, 2016 02:55 AM2016-07-19T02:55:18+5:302016-07-19T02:55:18+5:30

शिवसेनेने हा प्रश्न विशिष्ट काळात सोडवण्याची भूमिका न घेता उलट त्या प्रश्नावर रहिवाशांच्या बाजूने उभे ठाकलेले नगरसेवक मोहन उगले यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे

Uglenna disciplinary notice | उगलेंना शिस्तभंगाची नोटीस

उगलेंना शिस्तभंगाची नोटीस

googlenewsNext


कल्याण : गेली १८ वर्षे पालिकेत सत्तेत असूनही आधारवाडी डम्पिंग हटवण्याचा प्रश्न सोडवू न शकलेल्या शिवसेनेने हा प्रश्न विशिष्ट काळात सोडवण्याची भूमिका न घेता उलट त्या प्रश्नावर रहिवाशांच्या बाजूने उभे ठाकलेले नगरसेवक मोहन उगले यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. हे डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षांत बंद होईल, असे आश्वासन देण्यासाठी आयुक्त-महापौरांनी केलेला दौरा ही नौटंकी असल्याची सडकून टीका केल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचवेळी हा प्रश्न सोडवण्याबाबत कोणतीही स्पष्ट कालमर्यादा ठरवून न घेता पक्षाच्या नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.
आयुक्त-महापौर म्हणतात त्याप्रमाणे आधारवाडीचे डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षांत नव्हे, तर पुढील पाच वर्षात स्थलांतरित झाल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकीय संन्यास घेईन, अशी जाहीर भूमिका शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी घेतली होती. ‘लोकमत’ तर्फे ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘आधारवाडी डम्पिंग : समस्या आणि उपाय’ या विषयावर पार पडलेल्या चर्चासत्रात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांनी डम्पिंगवचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन उदासीन असल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना थेट महापौर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर हल्लाबोल केला होता. राजीनाम्याची भाषा आणि तसेच महापौरांवर थेट टीका करणाऱ्या उगलेंना पक्षाचे गटनेते रमेश जाधव यांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी पक्षाने चक्क कारवाईची नोटीस बजावल्याने शिवसेना डम्पिंगविरोधात की नगरसेवकाविरोधात असा सवाल पक्षात उपस्थित झाला आहे. शिवाय यानिमित्ताने प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिवसनेत सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमधील दुर्गंधी, आगीच्या घटना तीव्र झाल्या की महापौर आणि आयुक्त पाहणीची नौंटकी पार पडतात, अशी कडवट टीका उगले यांनी केली होती. आधारवाडीचे डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षात हटविण्याच्या घोषणा जरी केल्या जात असल्या तरी प्रशासनाची कूर्मगती पाहता येत्या पाच वर्षात जर डम्पिंगचा प्रश्न निकाली निघाला तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन आणि राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा त्यांनी उद््वेगाने केली होती. (प्रतिनिधी)
सेनेला घरचा अहेर : सोमवारच्या महासभेतही उगले यांच्या नौंटंकीच्या वक्तव्याचा आणि राजीनाम्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर आणि मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी उपस्थित केला. उगले यांनी याप्रकरणी खुलासा करावा, अशी मागणी अन्य पक्षातील सदस्यांकडूनही करण्यात आली. महापौरांच्या दौऱ्याची संभावना नौटंकी अशी करून उगले यांनी शिवसेनेला एकप्रकारे घरचा आहेर दिल्याचा टोलाही विरोधकांनी लगावला.

Web Title: Uglenna disciplinary notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.