उजनी धरण परिसराला राष्ट्रीय अभयारण्य घोषित करावे : मिलिंद गुणाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:45 PM2019-05-21T12:45:06+5:302019-05-21T12:49:43+5:30
मिलिंद गुणाजींच्या कॅमेºयात उजनी परिसरातील पक्षी कैद
सोलापूर : उजनी धरण परिसराची प्राकृतिक व भौगोलिक परिस्थिती अतिशय अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी पक्षीवैविध्याची परंपरा लाभली आहे. केंद्र व राज्य सरकारने या परिसराला राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करून या परिसराच्या संरक्षणाचे काम हाती घ्यायला हवे, असे मत मिलिंद गुणाजी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
वन्यजीव छायाचित्रकार व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी उजनी पाणलोट क्षेत्रात पक्षी निरीक्षण केले. गुणाजी यांनी स्थानिक पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांच्या मदतीने पक्षी निरीक्षण करून या परिसरातील अनेक पक्ष्यांना आपल्या कॅमेºयात कैद केले.
सूर्योदयापूर्वी पळसदेव परिसरात सुरु झालेली त्यांची ही मोहीम डिकसळ व कोंढारचिंचोलीजवळ जुन्या रेल्वे पुलाजवळील परिसरात भटकंती करून संपली.
गुणाजी हे एका खासगी कामानिमित्त सोलापुरात आले होते. त्यांनी मुंबईच्या परतीच्या प्रवासात भिगवणजवळच्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पक्ष्यांचे छायाचित्रीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आल्याचे डॉ़ अरविंद कुंभार यांनी सांगितले. या मोहिमेत शेकडो रोहित पक्षी व हजारोंच्या संख्येने मुग्धबलाक व चितबलाक हे करकोचे आढळले. निरीक्षणाच्या वेळी स्थलांतरित बदके परत गेल्याने त्यांच्या चित्रीकरणाची संधी हुकली.
यावेळी राखी बगळे, पाणकावळे, शेकाट्या, पाणभिंगरी, तुतुवार नदीसुरय, पाणभिंगरी, कुदळ्या आदी जलपक्ष्यांची छायाचित्रे काढण्यात आली. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात धरणनिर्मितीपासून दरवर्षी शंभराहून अधिक प्रजातींच्या परदेशी पक्षी हजारोंच्या संख्येने हिवाळी पाहुणे म्हणून येतात.
शासनदरबारी पाठपुरावा करू : गुणाजी
उजनी जलाशय परिसराचे पक्षी अभयारण्य बनविण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करु, असेही एकेकाळी महाराष्ट्र राज्य वनविभागाचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून कर्तव्य बजावलेले गुणाजी यावेळी म्हणाले.