उजनी धरण भरले हो काठोकाठ, पण यंदा 'फ्लेमिंगो'नेच फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 07:02 PM2021-01-15T19:02:39+5:302021-01-15T19:21:56+5:30

तापमान, वाऱ्याची दिशा आणि लहरींचे अचूक ज्ञान पक्ष्यांना असते.

Ujani dam filled the shore but this time 'Flamingo' turned the tide | उजनी धरण भरले हो काठोकाठ, पण यंदा 'फ्लेमिंगो'नेच फिरवली पाठ

छायाचित्र : तन्मय ठोंबरे

googlenewsNext
ठळक मुद्देपट्टकादंब, चक्रवाकचे दर्शन : लांबलेला पावसाळा, हवामान बदलामुळे उशिरा स्थलांतर

पुणे : यंदा हवामानात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे भिगवण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असून, फ्लेमिंगोची प्रतीक्षा करावी लागत आहे. पट्ट कादंब (bar-headed geese), चक्रवाक आणि अन्य स्थानिक पक्ष्यांचे मात्र सहज दर्शन होत आहे. यंदाच्या दमदार आणि दिवाळीपर्यंत लांबलेल्या पावसामुळे उजनी धरण काठोकाठ भरले आहे. परिणामी पाणथळ जागा आणि त्या भोवती तयार होणारा पक्ष्यांसाठीचा अनुकूल अधिवास यंदा नाही. परिणामी फ्लेमिंगो अद्याप आलेले नाहीत. पाणी पातळी कमी झाल्यास जानेवारीअखेरपर्यंत त्यांचे आगमन होऊ शकते, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञांनी वर्तविली.
‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हां फिरविसी जगदिशा’ या उक्तीप्रमाणे फ्लेमिंगो वर्षातून दोनदा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात आणि दक्षिणेकडून पुन्हा उत्तरेकडे हे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांची असामान्य दृष्टी स्थलांतर करताना उपयोगी ठरते.
जमिनीवरील वैशिष्ट्यपूर्ण चिन्हे दिसावीत म्हणून फ्लेमिंगो अतिउंचावर उडावे लागते. विशेषत: समुद्र ओलांडत असताना उंचीवरुन उडणे त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरते. रात्री आकाशातून प्रवास करणारे पक्षी ग्रह-नक्षत्रांचा मागोवा घेत संचार करतात, असा सिद्धांत जर्मन पक्षिशास्त्रज्ञ ई. एफ. जी. सावर यांनी मांडला आहे. पक्षी आकाशातील ग्रहगोलांना अनुसरून रात्री स्थलांतर करतात. एरवी भूतलावरील चिन्हे अंधारात दिसणे अशक्यच असते. पक्षी आपल्या इच्छित स्थानी कसे पोचतात याचा उलगडा अद्यापही नेमकेपणाने झालेला नसल्याचे निरिक्षण अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी त्यांच्या ‘पक्षीकोशा’त नमूद केले आहे.
 ........... 
...म्हणून पक्ष्यांचे आगमन कमी
यंदा पाऊस लांबला. त्यामुळे जलाशयाभोवतालची अन्नसाखळी तयार होण्यास कालावधी लागणार आहे. तापमान, वाऱ्याची दिशा आणि लहरींचे अचूक ज्ञान पक्ष्यांना असते. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्येच तज्ज्ञांनी अंदाज वर्तविला होता की, स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणार आहे. त्यानुसार अजूनतरी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमीच आहे.


 ............
दिवसाला दोनशे ते तीनशे किमीचा प्रवास
पट्ट कादंब हा दिवसाला दोनशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करू शकतो आणि ताशी वेग ३५ ते ४५  किलोमीटर असते. सुमारे २७ हजार फूट उंचावरून ते उडत पुण्याकडे येतात. तिबेट, कझाकिस्तान, रशिया, मंगोलिया या  देशांमधून पट्टकादंब भारतात येतात.
.............
बार हेडेड गूस, चक्रवाक, फ्लेमिंगो साधारणपणे ऑक्टोबर-नोंव्हेबरमध्ये पुणे परिसरात येतात. यंदा पाऊस खूप झाल्याने उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्षी अजून आले नाहीत. त्यांना पाणथळ (दलदल) जागा लागते. पण अजून तशी जागा भिगवणला निर्माण झालेली नाही. हवामानाचा अंदाज त्यांना असतो. पट्ट कादंब हे उडण्याची प्रचंड क्षमता असणारे पक्षी एव्हरेस्टवरून उडत येतात. त्या पर्वतावर ऑक्सिजन विरळ असतो तरी ते सहज येतात. यावरून या पक्ष्यांचे वैशिष्ट्य समजून येते.
- धर्मराज पाटील, पक्षी अभ्यासक
.......................
आपल्याकडे येणारे फ्लेमिंगो प्रामुख्याने पर्शियातून येतात. ते स्थलांतर करण्यापुर्वी पाहणी करतात. जर तेथील वातावरण अनुकूल नसेल तर तिथे थांबत नाहीत. नंतर येतात. हे पक्षी दिवसाला १०० ते २०० किमी अंतर कापतात.
- डॅा. सतीश पांडे, पक्षीतज्ज्ञ 

 

Web Title: Ujani dam filled the shore but this time 'Flamingo' turned the tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.