उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ३७ मिमी पावसाची नोंद
By admin | Published: June 5, 2016 09:05 PM2016-06-05T21:05:17+5:302016-06-05T21:05:17+5:30
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या पहिल्याच दिवशी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरणाच्या इतिहासात सर्वात नीचांकी पातळी या वर्षी झाली आहे. उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे ५२.५२ टक्क्यांपर्यंत गेली आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी ४८५३५२ दलघमी, एकूण पाणीसाठा १००५९२ दलघमी तर मृतसाठा उणे ७९६५९ दलघमी एवढा नोंदविण्यात आला आहे. मृतसाठा असणाऱ्या ६४ टीएमसी पाण्यापैकी तब्बल २८१३ टीएमसी पाणी वापरात आले आहे. यातील केवळ ३५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यात गाळाचे प्रमाण २५ टीएमसी असून केवळ पाणी म्हणून १० ते १२ टीएमसी पाणी उजनीत शिल्लक आहे.
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसात ३७४० मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे उजनी धरणात यंदा तरी पाणीसाठा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आद्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण ६४० मिमीवरून ते ५२० मिमीवर खाली आले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केली असली तरी उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या १८ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.