उजनीवरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित, १२ मेगावॅट निर्मिती होणार
By admin | Published: September 28, 2016 07:36 PM2016-09-28T19:36:06+5:302016-09-28T19:36:06+5:30
उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली
ऑनलाइन लोकमत
सोलापूर/बेंबळे, दि. 28 - उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली आहे. त्यामुळे बुधवार सायंकाळी ५ वाजल्यापासून पॉवर हाऊस (वीज प्रकल्पासाठी १५०० क्युसेकने) पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी प्रथमच वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. या वीज प्रकल्पातून १२ मेगावॅट वीज निर्मिती चालू झाली आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी ४९१ मीटरच्या खाली आल्यास वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. कारण या प्रकल्पाला १६०० क्युसेक पाणी वापरावे लागते. त्यामुळे उजनी धरणात पुरेशा पाणी साठा झाल्याशिवाय वीजप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जात नाही. सध्या उजनी धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दौंड येथुन ७६९३ क्सुसेकने पाणी धरणात येत आहे. कालव्यात चालू असलेल्या १५०० क्युसेकमध्ये वाढ करून तो १८०० करण्यात आला आहे़ तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्युसेक चालू केला आहे.
उजनी धरण १०० टक्के होण्यास केवळ ३ टक्के म्हणजे १ टीएमसी पाणी आवश्यक आहे. परंतु उजनी धरणात ११० टक्के म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा केला जातो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ७ टीएमसी पाण्याची गरज आहे.