उज्जैनमध्ये हरित कुंभाचा संदेश पोहोचविणार
By admin | Published: February 8, 2016 04:33 AM2016-02-08T04:33:24+5:302016-02-08T04:33:24+5:30
कुंभमेळ्यात गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या हरित कुंभ उपक्रमाचा अनुकूल परिणाम दिसून आल्यानंतर आता उज्जैनसह सर्वच कुंभमेळ्यांत असा उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात येणार
नाशिक : कुंभमेळ्यात गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या हरित कुंभ उपक्रमाचा अनुकूल परिणाम दिसून आल्यानंतर आता उज्जैनसह सर्वच कुंभमेळ्यांत असा उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात येणार आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या चेतना यात्रेचा प्रारंभ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
नाशिकमध्ये गेल्या वर्षी झालेल्या कुंभमेळ्यात लाखो भाविक आल्यानंतर गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी हरित कुंभ संकल्पना राबविण्यात आली होती. आता अन्यत्रही हरित कुंभाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. रविवारी रामकुंडावर जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षीरसागर, कांचन पगारे आदींच्या उपस्थितीत यात्रेचा प्रारंभ झाला.
कुंभमेळ्यातून जलसंपत्तीचे महत्त्व आणि संवर्धनाचा संदेश दिला जातो. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात गोदावरीच्या पात्रातील शुद्ध जलामुळे सोहळ्याचे पावित्र्य जपले गेले. लोकसहभागातून नदीप्रदूषण टाळण्याचा संदेश दिला गेला. चेतना यात्रेच्या माध्यमातून चार कुंभमेळ्यांच्या ठिकाणी पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचेल आणि पर्यावरणपूरक सोहळा साकार होईल, असे मत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)