अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:03 IST2025-02-26T11:03:06+5:302025-02-26T11:03:06+5:30
Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मंजूर केली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत.

अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार
Ujjwal Nikam Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. आठ मागण्यासाठी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणीचाही समावेश होता.
संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने लोटले असून, तपासात कोणतीही प्रगती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आता देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
देशमुख कुटुंबीयांची एक मागणी मान्य
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर ती मान्य करण्यात आली आहे. राज्य सरकारने तसे आदेश काढले आहेत. आदेशानुसार, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकिलांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबद्दल धनंजय देशमुख म्हणाले, "हा जो तपास सुरू आहे, यामध्ये त्यांच्या नियुक्तीचा फायदा होऊ शकतो. आता आरोपपत्रही दाखल होणार आहे, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची असेल."
माझी तयारी नव्हती, कारण...; अंजली दमानिया
अंजली दमानिया म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची दोन महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्यांची नियुक्ती करणार असे बोलले जात होते. आता त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे बरं यासाठी वाटतंय की, धनंजय देशमुख यांना ते वकील म्हणून हवे होते. त्यांचा निकमांवर प्रचंड विश्वास आहे. माझी त्यांच्याशी (धनंजय देशमुख) जेव्हा चर्चा झाली होती, तेव्हा मी इतकी तयार नव्हते. कारण उज्ज्वल निकमांच्या मुलाने धनंजय मुंडेंची एकदा केस लढली होती."
"धनंजय देशमुख यांना उज्ज्वल निकम यांच्या प्रचंड विश्वास आहे उज्ज्वल निकमांवर आणि मला देखील वाटतं की, वकील म्हणून ते अतिशय उत्तम आहेत, पण त्यांचा मुलगा लढला होता म्हणून मी नकार दिला होता. पण, देशमुख कुटुंबाला ते हवे असतील, तर त्यांची मागणी पूर्ण झाल्याचे बघून चांगलं वाटतं आहे", असे दमानिया निकमांच्या नियुक्तीबद्दल बोलल्या.