महाराष्ट्रात सुरू होणार ‘उज्ज्वला’
By Admin | Published: October 7, 2016 06:05 AM2016-10-07T06:05:10+5:302016-10-07T06:05:10+5:30
देशातील सर्वच महिलांची स्वयंपाकघरातील चुलीच्या धुरापासून मुक्तता व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा राज्यातील शुभारंभ
मुंबई : देशातील सर्वच महिलांची स्वयंपाकघरातील चुलीच्या धुरापासून मुक्तता व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा राज्यातील शुभारंभ शुक्रवारी मुंबईत होणार आहे. स्वयंपाकाचा गॅस घेण्याची ऐपत नसणाऱ्या देशभरातील दारिद्र्यरेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता, गोरेगाव पश्चिमेकडील हायपर सिटीसमोरील प्रेमनगर येथे होणाऱ्या शुभारंभाच्या कार्यक्रमात या योजनेअंतर्गत काही जणांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, महिला आणि बालविकासमंत्री विद्या ठाकूर आणि मुंबईतील आमदार, खासदारदेखील या समारंभात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)