पोलिसांच्या फोनची वाट पाहतेय उज्मा शेख

By admin | Published: January 24, 2016 12:38 AM2016-01-24T00:38:41+5:302016-01-24T00:38:41+5:30

इसिसमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याच्या संशयावरून मुंब्रा येथील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी पहाटे

Ujma Shaikh waits for the police's call | पोलिसांच्या फोनची वाट पाहतेय उज्मा शेख

पोलिसांच्या फोनची वाट पाहतेय उज्मा शेख

Next

- पंकज रोडेकर/ कुमार बडदे , ठाणे / मुंब्रा
इसिसमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याच्या संशयावरून मुंब्रा येथील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी पहाटे अटक करून नेताना त्याची माहिती फोनवर क ळवू, असे सांगण्यात आले होते. मात्र, २४ तास उलटले तरीही एनआयए अथवा स्थानिक पोलिसांचा फोन न आल्याने त्याची पत्नी उज्मा या चिंताक्रांत झाल्या आहेत.
घरातला फोन वाजला तर तो आपल्या पतीची माहिती देण्याकरिता आलेला असेल, असे वाटून उज्मा झटपट फोन घेत आहेत. परंतु, पतीची खबर देणारा फोन न आल्याने शेख कुटुंब चिंतेत आहे. ते आपल्या पतीला घेऊन मुंबईला गेलेत की दिल्लीला, काही कळत नाही. कुणी ते मुंबईत असल्याचे तर कुणी दिल्लीला असल्याचे सांगते. कुणाशी बोलायचे व कुणाला भेटायचे, ते माहीत
नाही. त्यामुळे आता लवकरच वकील घेऊन मुंबईत एटीएसचे कार्यालय गाठायचे शेख कुटुंबाने ठरवले
आहे. आम्हाला चांगला वकीलही माहीत नाही, असे उज्मा यांनी सांगितले.
मुदब्बीरला मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातून अटक झाली, अशी वृत्ते वाहिन्या व वृत्तपत्रांत शनिवारी झळकली. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. मात्र, शनिवारी अमृतनगर परिसरात फेरफटका मारला असता इसिसचा म्होरक्या या भागातून पकडला गेला, याचा लवलेशही लोकांच्या बोलण्यात जाणवला नाही. मुदब्बीरच्या घरापाशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कॅमेरे, ओबी व्हॅन यांची गर्दी होती. शेख कुटुंब घर बंद करून दुसरीकडे गेले असेल, ही शक्यताही फोल ठरली. उलटपक्षी उज्मा व मुदब्बीरच्या घरातील अन्य मंडळी ही प्रसिद्धिमाध्यमांना रीतसर प्रतिक्रिया व माहिती देत होते. त्यांचे वागणे-बोलणे हे सर्वसामान्य वाटले.
शुक्रवारी पहाटे पोलीस घरी आले. त्या वेळी मुदब्बीरची घरात चौकशी करून त्याच्यासह काही सामान घेऊन गेले. त्याला घेऊन जात असताना कुठे नेत आहात, अशी विचारणा आम्ही सातत्याने केली. मात्र, पोलिसांनी काहीच सांगितले नाही. आमच्या फोनची वाट पाहा. एवढेच पोलिसांनी सांगितले, असे उज्मा सांगत होत्या. त्यांना दोन लहान मुली असून त्या घरातच खेळत होत्या.

परिसरात शांतता...
मुदब्बीरला अटक केल्यानंतरही तो राहत असलेल्या परिसरात आणि मुंब्रा शहरात शांतता होती. मुदब्बीरच्या घराजवळील शाळा, दुकाने, कार्यालये येथील व्यवहार सुरळीत सुरू होते.

इसिसविरोधात
मौलानांची जनजागृती
इस्लाम धर्म हा शांतताप्रिय धर्म असून निरपराधांचे बळी देऊ नका, हीच धर्माची शिकवण आहे.
या धर्माची खरी ओळख इस्लामच्या अनुयायांना व्हावी, याकरिता येत्या शुक्रवारी विशेष नमाजाच्या वेळी मशिदीत जनजागृती करण्यात येणार असल्याचे मौलाना सलामत तुल्ला नदवी यांनी सांगितले.
एका व्यक्तीच्या चुकीचे खापर मुंब्रा येथील पाच लाख मुस्लीम नागरिकांच्या शिरावर फोडू नये, असेही ते म्हणाले.

Web Title: Ujma Shaikh waits for the police's call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.