सुप्रिया सुळे लाजल्या आणि घेतला ''हा'' उखाणा !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 09:41 PM2018-07-13T21:41:20+5:302018-07-13T21:43:06+5:30
खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघात भेटी, दौरे यात व्यस्त आहेत. दिवेघाटातील वारीतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशाच एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला.
पुणे : खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघात भेटी, दौरे यात व्यस्त आहेत. दिवेघाटातील वारीतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशाच एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला. हा आग्रह ऐकल्यावर त्यांनी जरासे आढेवेढे घेतले पण अखेर समोर बसलेल्या विद्यार्थिनींची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.
त्याचे झाले असे की, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाऊंडेशनच्यावतीने दौंड तालुक्यातील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे विद्यार्थीनींना टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत सुळे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.यावेळी सुळे यांचे भाषण झाल्यावर त्यांना उखाण्याचा आग्रह झाला. त्यावर त्यांनी मला इंग्रजीत नाव घेता येत नाही असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही केला. पण मग त्यांना मराठीत उखाणा घ्यायला सांगितले. माझं फेसबुक लाईव्ह सुरु आहे. उद्या पेपरवाले याची चर्चा करतील अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.पण समोरचे श्रोते माघार घेत नाहीत म्हटल्यावर अखेर काहीस मिश्किल शैलीत त्यांनी 'ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास, 'सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास' असा उखाणा घेतला आणि सर्वानीच टाळ्यांनी दाद दिली.उखाणा घेतल्यावर त्यांनी मिश्किल हसत आपली प्रतिक्रिया दिली.