उल्हासनगर भाजपाचेच!

By admin | Published: April 5, 2017 03:47 AM2017-04-05T03:47:04+5:302017-04-05T03:47:04+5:30

पालिकेत भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यासाठी शिवसेनेने जंग जंग पछाडले

Ulhasnagar BJP! | उल्हासनगर भाजपाचेच!

उल्हासनगर भाजपाचेच!

Next

उल्हासनगर : पालिकेत भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यासाठी शिवसेनेने जंग जंग पछाडले असले, तरी साई पक्ष अखंड राहिल्याने बुधवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबई, ठाण्यात सत्तेची संधी हुकलेल्या भाजपाच्या शिरपेचात उल्हासनगरच्या सत्तेच्या रूपाने मानाचा तुरा खोवला जाईल. उल्हासनगरात भाजपाचाच महापौर असेल आणि तो सिंधी समाजाचा असेल या भाजपाच्या दोन्ही घोषणा यानिमित्ताने प्रत्यक्षात येतील. तोवर महापौर शिवसेनेचा की भाजपाचा यावरून जोरदार सट्टा लागला आहे. पण सट्टेबाजांचा कौलही भाजपालाच आहे.
घटना सादर करण्यावरून साई पक्षाच्या मान्यतेचा मुद्दा जरी कोकण विभागीय आयुक्तांनी उपस्थित केला असला तरी त्याचा निकाल साई पक्षाच्या बाजूने लागला. त्यामुळे त्यांना व्हिप जारी करण्याचा अधिकार मिळाला असून त्यांचे सर्व नगरसेवक भाजपासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संख्याबळात भाजपाची सरशी झाली आहे. राजकीय घोडेबाजार आणि ताकदीचा संघर्ष टोकाला गेल्याने बुधवारच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उल्हासनगरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेने महापौरपदाचे आमिष दाखवून साई पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न करून सत्तेसाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. एरव्ही भाजपासोबत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला आपल्यासोबत घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्ष अशा पाच पक्षांची मोट बांधली. तरीही त्यांना बहुमतासाठी ४० चा आकडा गाठता आला नाही. साई पक्षातील फुटीसाठी खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात उतरले. मात्र राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पक्षावरील आपली मांड ढिली होऊ दिली नाही. त्यामुळे भाजपा-साई पक्षाच्या नगरसेवकांना महाबळेश्वरला नेण्यात आले. ते सर्व नगरसेवक निवडणुकीपूर्वी अर्धा तास अगोदर उल्हासनगरला दाखल होतील आणि महापौरपद, उपमहापौरपद, स्वीकृत सदस्य आदी निवडणुका पार पडतील. महापौरपदासाठी शिवसेना-भाजपातील जोरदार रस्सीखेच पाहता आणि दोन्ही पक्षातील बिघडलेले संबंध पाहता महापालिका परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे पोलीस उपायुक्त सुनील भारद्बाज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>साई पक्षाला गट म्हणून मान्यता
कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मंगळवारी रात्री उशिरा साई पक्षाला गट म्हणून मान्यता दिली. त्यांनी सादर केलेली घटना आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे साई पक्षाला स्वीकृत नगरसेवकपदही मिळेल आणि गट म्हणून मान्यता दिल्याने पक्षादेश काढून सर्व नगरसेवकांना भाजपाला मत देणे बंधनकारक होईल. त्यामुळे भाजपाला दिलासा मिळाला, तर साई पक्षाचे सहा मगरसेवक फोडण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांना सुरूंग लागला आहे.
नगरसेवक चव्हाणांच्या पहाऱ्यात
कोणत्याही परिस्थितीत उल्हासनगरमध्ये भाजपाचाच महापौर बसेल, हा दिलेला शब्द पाळण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा,ओमी टीम आणि साई पक्षाच्या ४४ नगरसेवकांवर गेले पाच दिवस पहारा ठेवल्याची चर्चा आहे. पत्नीला महापौरपद न मिळाल्याने सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असलेल्या ओमी कलानी यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनाही महाबळेश्वरला नेण्यात आले. सध्या ओमी यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. तरीही त्यांना विशेष गाडीने नेण्यात आले.
>कलानींना स्थायी समिती?
नाराज ओमी कलांनी यांना सव्वा वषार्नंतर महापौरपदाचे आमिष दाखवण्यात आले असले, तरी तो काळ मोटा आहे. तोवर स्थायी समितीत
स्थान देऊन ओमी कलानी गटाची नाराजी दूर करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपाच्या अन्य गटांनाही वेगवेगळ््या समित्यांत सामावून गेतले जाणार आहे.
पोलीस छावणीचे स्वरूप
महापौर-उपमहापौर निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी महापालिका परिसरात सकाळपासून कडक पोलीस बंदाबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घातले जाणार आहेत. २०० पेक्षा जास्त पोलीस आणि राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली जाणार आहे.
शिवसेनेचे बळ
शिवसेना २५
राष्ट्रवादी ४
रिपाइं २
काँग्रेस १
पीआरपी १
भारिप १
एकूण ३४
>भाजपाचे बळ
भाजपा ३२
साई पक्ष १२
एकूण ४४

Web Title: Ulhasnagar BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.