उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानींना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:58 PM2020-07-07T18:58:01+5:302020-07-07T19:02:35+5:30
उल्हासनगरातील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी आले होते. त्यावेळी फडणवीस यांचे कट्टर समर्थक व शहराचे आमदार कुमार आयलानी गैरहजर राहिल्याने विविध चर्चेला उधाण आले होते.
उल्हासनगर : उल्हासनगरचे आमदार कुमार अायलानी यांच्यासह कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच महापालिकेचे उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारीया यांनाही संसर्ग झाला असून भालेराव यांच्यावर मुंबईत तर वधारीया यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उल्हासनगरातील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी आले होते. त्यावेळी फडणवीस यांचे कट्टर समर्थक व शहराचे आमदार कुमार आयलानी गैरहजर राहिल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाचे लक्षणे असल्याने येवू शकलो नाही. असे सोशल मीडियावर सांगितले होते. अखेर त्यांच्यासह कुटुंबाच्या सदस्याचा स्वाब अहवाल सोमवारी पोझीटीव्ह आला. आयलानी यांची धर्मपत्नी व माजी महापौर, विद्यमान नगरसेविका मिना आयलानी, मुलगा धिरजसह त्याची धर्मपत्नी आदींना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी नेन्यात आले. शहरातील रुग्णालयाची पाहणी, गरजू व गरीबांना अन्न धान्य वाटप, नागरिकांच्या प्रश्न सोडतांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा. असे आयलानी यांचे मत आहे. भाजपचे एका माजी आमदार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेचे उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारीया यांना कोरोनाचा संसर्ग झाला. भालेराव यांच्यावर मुंबई येथे तर वधारीया यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. भालेराव यांनी कोरोना मुक्त झाल्यानंतर पुन्हा शहरवासीयांची सेवा पुर्वी प्रमाणे सुरु ठेवण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनेचे -२, राष्ट्रवादीचा -१, भाजपचे -६ नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला सुरु असून मुंबई व शहरातील विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एकूणच कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नागरिकांनी काम असेलतरच घरा बाहेर पडण्याचा सल्ला आमदार कुमार आयलानी यांनी शहरवासीयांना दिला आहे. दरम्यान कोरोणामुळे पालिकेच्या दोन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन सहायक आयुक्तांसह २० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शहरात वाढतोय कोरोनाची संख्या
कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून १५ पेक्षा जास्त महापालिका अधिकारी, कर्मचारी, मध्यवर्ती रुग्णालयातील २५ पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, १२ पेक्षा जास्त पोलिस आदींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर शिवसेनेचे -२, राष्ट्रवादी -१, भाजप -४ व रिपाइ -१ अश्या सात पेक्षा जास्त नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.