उल्हासनगर विकास आघाडीतून रिपाइं बाहेर?
By admin | Published: January 31, 2017 03:16 AM2017-01-31T03:16:12+5:302017-01-31T03:16:12+5:30
रिपाइंच्या काही जागांवर ओमी टीमने हक्क सांगितल्याने उल्हासनगर विकास आघाडीतून (यूडीए) बाहेर पडण्याचा इशारा आठवले गटाने दिला. ओमी टीमच्या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच
- सदानंद नाईक, उल्हासनगर
रिपाइंच्या काही जागांवर ओमी टीमने हक्क सांगितल्याने उल्हासनगर विकास आघाडीतून (यूडीए) बाहेर पडण्याचा इशारा आठवले गटाने दिला. ओमी टीमच्या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच भाजपा आणि रिपाइंत जागावाटप होऊन त्यांना १२ जागा सोडण्यात आल्या होत्या. ओमी टीम भाजपासोबत आल्यावर या जागावाटपाला नख लागणार, हे गृहीत होते. तसे झाल्याने ओमींच्या आक्रमक भूमिकेमुळे यूडीएतील वाद चव्हाट्यावर आला आहे. रिपाइंनी दुसरा पर्याय शोधण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी भाजपावर विश्वासघाताचा आरोप केला आहे आणि शिवशक्ती-भीमशक्तीची हाक देत शिवसेनेसोबत जाण्याची चाचपणी सुरू केली आहे.
भाजपा आणि ओमी टीमच्या समझोत्यात दोघांचेही विद्यमान नगरसेवक सोडून इतर जागा निम्म्यानिम्म्या वाटून घेण्याचा निर्णय झाला. त्यात ओमी टीमने रिपाइंच्या १२ जागांपैकी काही जागांवर हक्क सांगितला. या जागा वाटल्याचे सांगूनही ओमी टीम ऐकत नसल्याने रिपाइं आठवले गटाचे कार्येकर्ते संतप्त झाले.
ज्या प्रभाग ७ मधील चारपैकी तीन जागा रिपाइंना सोडल्या आहेत, त्याच प्रभागात ओमी टीमने प्रचार सुरू केला आहे. त्याचा जाब शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह शहराध्यक्ष कुमार आयलानी यांना विचारला. पण, विकास आघाडी तुटेल, या भीतीने भाजपा नेत्यांनी त्याची कल्पना ओमी टीमला दिली नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी वाजतगाजत बनलेल्या विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे.