उल्हासनगर : चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:07 PM2021-07-01T18:07:29+5:302021-07-01T18:08:29+5:30
उल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन. अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन केले. यानंतर एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिले.
उल्हासनगरात पाणी पुरवठ्याचे वितरण असमान होत असून काही ठिकाणी दिवसाला दोन वेळा तर शहर पूर्वेला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कॅम्प नं-३ चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी निर्माण झाली. काही दिवसा पासून टाकलेल्या नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा न झाल्याने, जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याची मागणी झाली. मात्र शेकडो महिला गुरवारी रस्त्यावर येऊन, त्यांनी चोपडा कोर्ट चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या खाली ठिय्या आंदोलन केले. पाणी द्या, पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. महापालिका पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासह देऊनही महिला व नागरिक ऐकत नव्हते.
महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी आंदोलन करणाऱ्या महिला पैकी काही जणांना कार्यकारी अभियंता कार्यालयात चर्चेला बोलाविले. जुन्या जलकुंभात पुरेसा पाणी साठा जमा होत नसल्याने व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने चोपडा कोर्ट व आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती दिली. दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असलेतरी एक आठवडा पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी लागेल, असे रहेजा म्हणाले. शहर पूर्वेतील बहुतांश भागात दिवसाआड व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांत खदखद आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने शहर पूर्वेतील पाणी टंचाई सोडविली नाहीतर, येथेही असाच उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेना नगरसेवकावर नाराजी
कॅम्प नं-३ चोपडा व आंबेडकरनगर परिसरातून सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. सत्तेत असूनही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे. पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी केली.