मिहानमधील कंपन्यांना अल्टिमेटम
By Admin | Published: January 29, 2015 01:06 AM2015-01-29T01:06:02+5:302015-01-29T01:06:02+5:30
मिहानमधील कंपन्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. तीन महिन्यांच्या आत कंपन्यांनी कामे सुरू न केल्यास त्यांच्या जमिनी परत घेण्यात येईल,
पालकमंत्र्यांचे आदेश : तीन महिन्यात काम सुरू करा, अन्यथा जागा परत घेणार
नागपूर : मिहानमधील कंपन्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. तीन महिन्यांच्या आत कंपन्यांनी कामे सुरू न केल्यास त्यांच्या जमिनी परत घेण्यात येईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना बुधवारी मुंबईत झालेला मिहानच्या आढावा बैठकीत दिला. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, विविध कंपन्यांचे ३० पेक्षा जास्त प्रतिनिधी आणि मिहानचे अधिकारी उपस्थित होते.
देशातील नामांकित कंपन्यांनी मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी एमएडीसीकडून जागा खरेदी केल्या. या कंपन्यांनी अनेक वर्षांनंतरही बांधकाम सुरू केले नाही. कंपन्यांनी कामे सुरू करावीत म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) १० मोठ्या कंपन्यांना वारंवार नोटिसा दिल्या आहेत. त्याची दखल या कंपन्यांनी घेतली नाही. पूर्वीच्या सरकारने या कंपन्यांविरुद्ध नरमाईची भूमिका घेतली होती. पण आताचे सरकार मिहानच्या विकासाबाबत गंभीर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी देशविदेशातील कंपन्यांना आमंत्रित करीत आहेत. शिवाय रखडलेली विकास कामे तातडीने सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)
‘एचसीएल’कडे १४० एकर जागा
विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी एकूण ५५ कंपन्यांनी १,१५६ एकर आणि विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर १४ कंपन्यांनी २७७ एकर जागा विकत घेतली आहे. ५ ते १० वर्षांच्या कालावधीत अनेक कंपन्यांनी साध्या बांधकामाला प्रारंभ केला नाही. एचसीएल टेक्नॉलॉजीने १४० एकर जागा विकत घेतली आहे. इन्फोसिस लिमिटेड १४२ एकर, डीएलएफ १४० एकर, सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस १२८ एकर, एल अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लि. ५१ एकर आणि विप्रो टेक्नॉलॉजिसकडे २३ एकर जागा आहे. याशिवाय अनेक लहान कंपन्यांचीही कामे थंडबस्त्यात असल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पुनर्वसनाची कामे पुढील आठवड्यात
शिवणगावातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन वर्धा रोडवरील चिचभुवन येथे होणार आहे. येथील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी एमएडीसीने मागविलेल्या निविदा उघडल्या आहेत. पायाभूत सुविधांसह रस्त्याच्या कामाचे वर्कआॅर्डर पुढील आठवड्यात देण्यात येणार आहे. अर्थात पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. चिचभुवन येथे ६० हेक्टरवर विकास कामे सुरू होतील. याशिवाय १२.५० टक्के विकसित जमिनीची मागणी केलेल्यांना सुमठाणा येथे जागा देण्यात येणार आहे. येथील ६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यात येणार आहे.
तानाजी सत्रे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.