‘उमंग’ला तिन्ही खानची दांडी!
By admin | Published: January 23, 2017 04:17 AM2017-01-23T04:17:47+5:302017-01-23T04:17:47+5:30
एरव्ही मुंबई पोलिसांच्या भूमिका साकारून कोट्यवधींचा गल्ला जमवणाऱ्या बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींचा दुटप्पीपणा
मुंबई : एरव्ही मुंबई पोलिसांच्या भूमिका साकारून कोट्यवधींचा गल्ला जमवणाऱ्या बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींचा दुटप्पीपणा शनिवारी समोर आला आहे. मुंबई पोलिसांसाठी शनिवारी सायंकाळी आयोजित ‘उमंग’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाकडे बॉलिवूडमधील तिन्ही ‘खान’सोबत कपूर कुटुंबीयानेही पाठ फिरवली होती.
बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या आमिर, सलमान आणि शाहरूख यांच्यापैकी किमान एक स्टार या कार्यक्रमात येणे अपेक्षित होते. मात्र हे तिन्ही सुपरस्टार कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने अधिक चर्चा झाली. उमंगसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे सुपरस्टार म्हणून नावाजलेल्या अजय देवगण यानेही या कार्यक्रमाला दांडी मारली. सलमान खान शाहरूख खानच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचे कारण समोर आले आहे. मात्र त्याची कमतरता अभिनेत्री युलिया वेंतूरने भरून काढली. सलमानची खास मैत्रिण म्हणून युलियाची ओळख आहे.
याउलट पोलिसांच्या भूमिका साकारून हेच स्टार कोट्यवधींचा गल्ला जमवतात. शिवाय त्यांच्या संरक्षणासाठी हेच पोलीस दिवसरात्र खडा पहारा देत असतात. मात्र याच पोलिसांच्या मनोरंजनाची वेळ आल्यावर या कलाकारांना काही मिनिटेही देता येत नाहीत का?, यावर उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता शाहिद कपूर, अभिनेता अर्जुन कपूर, गायक सोनू निगम आणि अनेक दिग्गजांनी यावेळी आपल्या अदाकारीने पोलिसांना भुरळ घातली. (प्रतिनिधी)