उमर खालिद तळेगाव-दशासरचा
By Admin | Published: February 19, 2016 03:42 AM2016-02-19T03:42:21+5:302016-02-19T03:42:21+5:30
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील वादानंतर फरार झालेला उमर खालिद हा धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील मूळ रहिवासी आहे.
तळेगाव दशासर (अमरावती) : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील वादानंतर फरार झालेला उमर खालिद हा धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील मूळ रहिवासी आहे. त्याची पडकी हवेली आजही येथे अस्तित्वात आहे़
उमर खालिदचे वडील सैय्यद काझीम ईलीयाज रसूल हे तळेगाव दशासर येथील रहिवासी होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे ३० ते ३५ वर्षांपूर्वी ते नवी दिल्ली येथे गेले. तेथेच स्थिरावले. उमरचे मामा अमरावती येथील फार्मसी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. उमरचे वडील सैय्यद काझीम यांनी ‘अफकार ए मिल्ली’ हे मासिक नवी दिल्ली येथे सुरू केले़
उमर तळेगाव दशासरचा असल्याचे समजताच विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी गावात येऊन त्याच्याविषयी अधिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
तळेगाव दशासर येथे दिल्ली पोलीस येऊन गेले, अशी जोरदार चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. काही लोक उमर खालीदचा फोटो दाखवून माहिती विचारीत होते. ते पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. आमची वक्तव्ये त्यांनी नोंदवून घेतली, अशी माहिती गावकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
ग्रामपंचायतीचे रेकॉर्डही तपासले
तळेगाव दशासर येथील सवारपूर, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये संबंधितांनी उमरचा फोटो दाखवून चौकशी केली. मात्र, त्याला कोणीही ओळखू शकले नाही. ह्यत्याह्ण पथकाने ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डचीही तपासणी केली. (प्रतिनिधी)
‘जेएनयू’ प्रकरणातील उमर खालिद हा तळेगाव दशासर येथील मूळ रहिवासी आहे. बुधवारी दोन अज्ञात व्यक्ती आल्या होत्या. शिपायांनी त्यांना खालिदचे घर दाखविले. मी बैठकीसाठी अमरावतीत असल्यामुळे माझ्या पश्चात सर्व घडले. ते दोघे कोण? दिल्ली पोलीस की सीबीआय, हे नेमके सांगता येणार नाही.
- एस़ एल़ नितनवरे, ठाणेदार, तळेगाव दशासरउमर खालिदचा पूर्वोत्तर काश्मिरी फुटीरवादी संघटना व नक्षलवाद्यांसोबत संबध असल्याचा आरोप आहे. डेमोक्रॅटिक स्टुडंट युनियनचा तो सदस्य आहे. त्याने ‘जेएनयू’च्या संगीता दासगुप्ता यांच्या मार्गदर्शनात इतिहास विषयात पीएचडी केली आहे. ‘एमफिल’ पूर्ण करून त्याने २०११ मध्ये ‘जेएनयू’मध्ये प्रवेश केला. विविध राजकीय घडामोडींत तो सक्रिय आहे़ देशविरोधी कारवायांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. उमर खालिद हा देशांतील १८ विद्यापीठांत दिल्लीसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणार होता, असे पोलीस तपासात पुढे आले आहे़
दिल्ली पोलिसांचे पथक दाखल झाल्याची अधिकृत सूचना आम्हाला आलेली नाही. खालीदच्या घराबाबत कायद्यानुसार काय ती काळजी घेतली जाईल.
- लखमी गौतम, पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)