उमरग्यात विराट मराठा मोर्चा
By Admin | Published: January 16, 2017 08:58 PM2017-01-16T20:58:15+5:302017-01-16T20:58:15+5:30
मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतमालाला हमीभाव द्यावा आदी विविध न्याय मागण्यांसाठी
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 16- मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतमालाला हमीभाव द्यावा आदी विविध न्याय मागण्यांसाठी सोमवारी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात तालुक्यासह सीमावर्ती भागातील, मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विशेषत: यात महिला- मुलींची संख्याही लक्षणीय होती़.
स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवावा, शासकीय प्रकल्पांसाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा तत्काळ देऊन त्यांना उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात भागीदार करावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मराठा समाजातील मुला-मुलींच्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीपंपाचा विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा, उमरगा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठा समाजबांधवांचा महाराष्ट्रात समावेश करावा, उमरगा शहराचे नाव धाराशिव, असे करावे, गुंजोटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशासनाने हटविलेला पुतळा तत्काळ बसवावा आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला़.
सोमवारी सकाळपासूनच शहरात समाजबांधव हातात भगवे झेंडे घेवून शहरात दाखल होत होते़ राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडून येणाऱ्या गावातील मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी काळा मारुती मंदीर, आदर्श महाविद्यालय या ठिकाणी वाहनतळांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पश्चिमेकडून येणाऱ्या विविध गावातील मोर्चेकऱ्यांसाठी गंधर्व हॉटेल मैदान, दत्त कॉलनी, शिंदे मंगल कार्यालय ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
शहरातील दत्त मंदीर परिसरातून मोर्चास सोमवारी दुपारी १२़१५ वाजता सुमारास प्रारंभ झाला. दत्त मंदिरपासून थेट छत्रपती शिवाजी विद्यालयापर्यंत महिलांची स्वतंत्र रांग होती. मोर्चात उमरगा, लोहारा तालुक्यातील व कर्नाटक सीमावर्ती भागातील सकल मराठा समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या मोर्चात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी झाले होते़ मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांसाठी मराठा समाजबांधवांनी व मुस्लीम समाजबांधवांनी मोर्चाच्या मार्गावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली होती़.
९६ गावातील नागरिकांचा सहभाग
येथील सकल मराठा समाजबांधवांच्या मागील दिवसांपासून मराठा क्रांती मूकमोर्चाची तयारी सुरू होती. नियोजनाप्रमाणे या मोर्चात तालुक्यातील ९६ गावातील मराठा समाजबांधव व महिलांचा सक्रीय सहभाग असल्याचे दिसून आले. येथील बाबा पेट्रोल ते छत्रपती शिवाजी महाविद्यालय या तीन किमी अंतरापर्यंत महिला-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा होत्या.
स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम
मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी १ हजार युवक स्वयंसेवकांची व २०० महिला स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. स्वयंसेवकांमार्फत मोर्चाच्या मार्गावर पडलेल्या कचऱ्याची साफ-सफाई करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत येथील राष्ट्रीय महामार्ग भगवे ध्वज, मागण्यांचे फलक, भगवे फेटे, भगव्या टोप्या यांनी भगवामय झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रगिताने झाली सांगता
दुपारी १२़१५ वाजेच्या सुमारास निघालेला मोर्चा २़३० वाजण्याच्या सुमारास येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला. यावेळी गोदावरी गायकवाड हिच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. साक्षी जाधव, पल्लवी जगताप, उषा इंगळे, गोदावरी गायकवाड, प्रतीक्षा इंगोले, स्नेहा जाधव यांन मनोगत व्यक्त केले. उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीतानंतर मोर्चाची सांगता झाली.