उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:38 IST2025-02-27T13:37:30+5:302025-02-27T13:38:22+5:30
रूममेट खुशी ठरली संदेशदूत

उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो!
सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या नीलमच्या रक्तातील नातेवाइकांनी तिच्याकडे यावे, असे पत्र रुग्णालय आणि विद्यापीठाने तिच्या नातेवाइकांना दिले; पण इर्मजन्सी व्हिसा न मिळाल्याने तिच्यापर्यंत पोहोचणे कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणीपर्यंत तिच्या कुटुंबीयांना पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेत एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असणाऱ्या लेकीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिसा मिळत नाही.
रूममेट खुशी ठरली संदेशदूत
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे शिक्षणासाठी गेलेल्या नीलम शिंदे हिचा अपघात १४ फेब्रुवारीला झाला. याविषयीची माहिती कुटुंबीयांना १६ फेब्रुवारीला मिळाली. अपघातग्रस्त वडील आणि मामाचा मुलगा हे दोघेही अमेरिकेला जाण्यासाठी सज्ज झाले; पण व्हिसा मिळत नसल्याने सर्वच अडचणीचे झाले. अशा परिस्थितीत रोजच्या रोज नीलमच्या प्रकृतीबाबत तिची रूममेट खुशी माहिती देऊ लागली. कुटुंबीय आता तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांच्याही संपर्कात आहेत.
ही आहे अडचण
अमेरिकेत जाण्यासाठी बरेच कडक नियम आहेत. नीलमच्या नातेवाइकांनी सर्व नियमांची पूर्तता केली असली तरीही त्यांना व्हिसासाठी हिरवा कंदील मिळाला नाही. सामान्य पद्धतीने व्हिसासाठी अर्ज केल्यास २०२६ मध्ये नंबर येतोय. जादा पैसे भरून व्हिसा मिळवायचा म्हटला तरी एजंट एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगत आहेत. दिवसागणिक नीलमची प्रकृतीत चढ-उतार होत असल्याने कुटुंबीय अस्वस्थ होत आहेत.
आमच्या क्षमतेनुसार प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यातील राजकीय नेते, दूतावास अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला नीलमपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. - संजय कदम, नीलमचा मामा