डॉ.आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर बसविणार छत्री
By admin | Published: March 21, 2017 03:33 AM2017-03-21T03:33:46+5:302017-03-21T03:33:46+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर देण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर देण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर झाली. मुंबईतील कुपरेज गार्डन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्रांझची छत्री बसविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि वरिष्ठ अधिकारी तसेच नागसेन कांबळे, भन्ते करुणानंद थेरो, चंद्रकांत कसबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
१४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखिवण्यात येईल. तसेच लोकराज्य मासिकाचा विशेष अंक काढावा, चैत्यभूमी येथील स्तुपाचे काम या वर्षी पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यात सुरू होईल. ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. येत्या काही दिवसात या जागेचे हस्तांतरण पत्र राज्य शासनाला मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर बसविण्यात येणारी छत्री ही सात फूट गोल व साडेतीन फूट उंच असणार असून ती संपूर्ण ब्रांझमध्ये बनविण्यात येणार आहे. या परिसरात संविधान व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटाची माहिती असलेले फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विद्युत दिव्यांची सोयही करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन १२ लाख रु पये देणार असून उर्वरित रक्कम महापालिकेकडून मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
(विशेष प्रतिनिधी)