तब्येतीमुळे महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा खटला लढवणे अशक्य : अण्णा हजारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 07:39 AM2022-12-20T07:39:59+5:302022-12-20T07:40:22+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उच्च न्यायालयाला विनंती.
मुंबई : वाढते वय व तब्येत ठीक नसल्याने आपण महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याची केस लढवू शकत नाही. त्यामुळे माजी आमदार माणिक जाधव यांना या याचिकेत सह-याचिकादार करण्यात यावे, अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयाला सोमवारी केली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.
अण्णा हजारे ८४ वर्षांचे असून त्यांना या याचिकेसंबंधी सूचना देण्यासाठी किंवा यासंबंधी अन्य कामासाठी अहमदनगरवरून अन्य ठिकाणी प्रवास करणे जमत नाही. त्यामुळे अण्णा हजारे यांना माजी आमदार माणिक जाधव यांना २०१८ च्या याचिकेत सह-याचिकादार करायचे आहे, अशी माहिती अण्णा हजारे यांच्यावतीने ॲड. सतीश तळेकर यांनी प्रभारी मुख्य न्या. एस. गंगापूरवाला व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठाला दिली.
महाराष्ट्र सहकार बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ७५ आरोपींमध्ये समावेश आहे. तपास यंत्रणेने अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.