अनधिकृत जाहिरात, होर्डिंग्जविरुद्ध कडक कारवाई
By admin | Published: April 4, 2017 04:19 AM2017-04-04T04:19:16+5:302017-04-04T04:19:16+5:30
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले
ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले असून त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी त्यात्या परिमंडळ उपायुक्तांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
आयुक्तांनी पूर्वी नोडल आॅफिसर म्हणून जे सहायक आयुक्त होते, त्यामध्ये बदल करून आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपायुक्त यांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अर्थात, अधिनियमातील आणि नियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी मात्र त्या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांची असणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यापुढे घोषणा फलक, जाहिरात, पोस्टर्स, होर्डिंग्जसाठी परवानगी देताना त्यांचा क्रमांक, कालावधी, ठिकाण आदी बाबी ठळकपणे दिसतील, अशा प्रकारे जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्सवर छापावे. ज्या जाहिरातींवर या बाबी छापल्या नसतील, ते जाहिरात फलक तत्काळ काढून टाकण्याची कारवाई करावी व त्याचे छायाचित्र संबंधित पोलीस स्टेशनला पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी कळवा, मुंब्रा प्रभाग समितीसाठी परिमंडळ-१ चे उपायुक्त यांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून येथील तक्रारीसाठी ०२२-२५४१०४७०, नौपाडा, कोपरी, रायलादेवी, वागळे प्रभाग समितीसाठी परिमंडळ-२ चे उपायुक्त यांची नियुक्ती केली असून तक्रारींसाठी ०२२-२५४२९६४५, तर लोकमान्यनगर, वर्तकनगर, उथळसर, माजिवडा प्रभागांसाठी परिमंडळ-३ चे उपायुक्त यांची नियुक्ती केली असून तक्रारींसाठी ०२२-२५४४७२२०, ०२२-२५४०२३७५ हे क्रमांक आहेत. (प्रतिनिधी)
अनधिकृत जाहिराती, घोषणा फलकांना बंदी
नेत्यांचे वाढदिवस किंवा धार्मिक उत्सवांच्या प्रसंगी अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स कार्यक्र म होण्याच्या आधीच काढून टाकावेत. उत्सव काळात मंडप, बुथ यांना परवानगी देताना मंडप परिसरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स लावण्यात येऊ नये, अशी अट घालण्यात यावी, अशा सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या.