अनधिकृत बारला पोलिसांचे अभय

By admin | Published: September 18, 2016 01:43 AM2016-09-18T01:43:14+5:302016-09-18T01:43:14+5:30

स्थानिक पोलिसांचे अभय मिळत असल्याने शहरातील बंद झालेले अवैध व्यवसाय पुन्हा सुरू झाले

Unauthorized BARLA Police's Abbey | अनधिकृत बारला पोलिसांचे अभय

अनधिकृत बारला पोलिसांचे अभय

Next


नवी मुंबई : स्थानिक पोलिसांचे अभय मिळत असल्याने शहरातील बंद झालेले अवैध व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ चिराग बियर शॉपी बाहेर मद्यपींचा अड्डा सुरू झाला आहे. शेजारील श्री साई हॉटेलमध्ये अनधिकृतपणे बार चालविला जात असून तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
परिमंडळ एकच्या उपआयुक्तपदावर शहाजी उमाप असताना त्यांनी शहरातील सर्व जुगार अड्डे बंद केले होते. मटका, लॉटरी सेंटरसह सर्व अवैध व्यवसाय बंद केले होते. गणेशउत्सव व नवरात्रीमधील जुगारही बंद केला होता. परंतु त्यांच्या बदलीनंतर सर्व अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर गांजा अड्यांवर धाडसत्र सुरू झाले आहे. यानंतर शहरातील अनेक दक्ष नागरिकांनी लोकमतशी संपर्क साधून विविध विभागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील माहीती देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरील चिराग बियर शॉपी व हॉटेलचाही समावेश आहे. उत्पादनशुल्क विभागाने येथे बियर विक्रीचा परवाना दिला आहे. परंतु या दुकानामध्ये बसून बियर व मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. दुकानाच्या गेटवरही बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. बिशर शॉपीच्या बाजूला श्री साई हॉटेल आहे. परंतु या हॉटेलमध्ये चहा, नाष्टा, शीतपेय काहीही मिळत नाही. येथे अनधिकृतपणे बार सुरू केला आहे. जवळपास सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. सानपाडा पोलीस स्टेशनचे बिट मार्शल रोज किमान तीन ते चार वेळा येथून जातात. अनेक वेळा पोलिसांची वाहने येथेच उभी असतात. परंतु या अनधिकृत बारवर आतापर्यंत एकदाही कारवाई केलेली नाही.
सानपाडामधील सर्वात मोठा टपोरींचा अड्डा म्हणुनही हे ठिकाण ओळखले जाऊ लागले आहे. सायंकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत बिनधास्तपणे पदपथावर बसून मद्यपान सुरू असते. दोन वर्षापासून येथील पथदिवे बंद आहेत. सिडको व महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही येथे पथदिवे बसविले जात नाहीत. दारू विक्रेत्याच्या फायद्यासाठी संगणमताने असे केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अंधारातून ये - जा करताना प्रवाशांना विशेषत: महिलांना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. येथून जाणाऱ्या महिलांकडे पाहून मद्यपी शेरेबाजी करत असल्याचेही अनेकवेळा निदर्शनास आले आहे. रात्री रोडच्या दोन्ही बाजूने दूध घेवून येणारे ट्रक व टेंपो उभे केले असतात. या सर्व गोष्टींमुळे येथे अपघात होवून जिवित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तत्काळ कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
>ठेकेदाराची मुंढेंकडे तक्रार
सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरील पथदिवे दोन वर्षांपासून बंद आहेत. पथदिवे सुरू करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वारंवार केली आहे. परंतु महापालिकेच्या विद्युत विभागाचे ठेकेदार सिडकोकडे बोट दाखवत आहेत. सिडकोच्या विद्युत विभागाचे कर्मचारी महापालिकेला दोष देत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतरही पथदिवे बसविले जात नाहीत. महापालिकेचे विद्यूत विभागाचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याने नागरिक आता थेट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करणार असून ठेकेदारासह अभियंत्यांवरही कारवाईची मागणी केली जाणार आहे.
>पोलिसांना हे दिसत नाही का?
रेल्वे स्टेशनच्या समोर अनधिकृत बार सुरू आहे. चिराग बियरशॉपीमध्ये व बाहेरही अवैधपणे मद्यपान सुरू असते. रोज पोलिस अधिकारी व कर्मचारी येथून जातात.
परिसरातील नागरिक या अवैध व्यवसायांविरोधात आवाज उठवत आहेत. परंतू यानंतरही पोलिस कारवाई करत नाहीत.
राज्य उत्पादनशुल्क विभागाचे कर्मचारीही लक्ष देत नाहीत. रोडच्या दोन्ही बाजूला दुध वाहतूक करणारे ट्रक उभे राहून वाहतूक पोलिसही कारवाई करत नाहीत. सर्वांना दिसणारे हे अवैध प्रकार पोलिसांना दिसत नाहीत का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

Web Title: Unauthorized BARLA Police's Abbey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.