अनधिकृत फलकांची दहीहंडी
By admin | Published: August 24, 2016 12:57 AM2016-08-24T00:57:48+5:302016-08-24T00:57:48+5:30
गोकुळाष्टमी अर्थात कृष्ण जन्मोत्सव शुक्रवारी साजरा होणार असून, महापालिका निवडणूक जवळ आल्याने शहरातील विविध विभागात जोरदार फ्लेक्सबाजी सुरू आहे.
पिंपरी : गोकुळाष्टमी अर्थात कृष्ण जन्मोत्सव शुक्रवारी साजरा होणार असून, महापालिका निवडणूक जवळ आल्याने शहरातील विविध विभागात जोरदार फ्लेक्सबाजी सुरू आहे. अधिकृत फ्लेक्सवर दहीहंडी मंडळांनी अनधिकृत फ्लेक्सबाजी केली आहे.
शहरातील यंदाचा दहीहंडी उत्सवाचा जल्लोष काही औरच आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने गल्लीबोळातही उत्सवाचे आयोजन केले आहे. दहीहंडी मंडळांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन केले. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करण्याचे नियोजन केले आहे. सैराटच्या परश्या-आर्चीपासून मराठी, हिंदी मालिकांतील आणि चित्रपटातील कलावंतांना उत्सवाला बोलाविण्यासाठी चढाओढ लागली आहे.
एक लाखापासून तर २५ लाखांपर्यंतचे बक्षीस मंडळांनी ठेवले आहे. मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या बक्षिसाचे लोणी लुटण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वर्गणीसाठी धमकवण्याचे प्रकार अनेक मंडळांनी केले आहेत. (प्रतिनिधी)
>आता विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख चौकात अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी केली आहे. अधिकृत फलकांवरही विनापरवाना दहीहंडीचे फलक लावले आहेत. असे चित्र शहरातील प्रमुख चौकांत दिसत आहे. दहीहंडी मंडळांनी कोणतीही परवानगी न घेता फ्लेक्सबाजी केली आहे. हे फलक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भात असल्याने त्यांना रोखायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाली आहे. कारवाईकडे लक्ष लागले आहे.