‘अनधिकृत छावण्या नियमित करणार’
By admin | Published: February 18, 2016 06:53 AM2016-02-18T06:53:29+5:302016-02-18T06:53:29+5:30
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील
मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात सांगितले.
या जिल्ह्यांमध्ये सध्या अधिकृत २३७ चारा छावण्या सुरू असून, २ लाख १७ हजार जनावरे आहेत. त्या ठिकाणी चारा-पाणी पुरविण्यावर दररोज १ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जात आहेत. गरज असेल तिथे आणखी छावण्या दिल्या जातील. कोणतीही चारा छावणी बंद केली जाणार नाही, या बाबतचा आदेश मी कालच स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. आणखी २०० छावण्या सुरू करण्याची मागणी आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा पाहणी करून गरज असेल तिथे छावणी देईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी पाऊस पडल्याने बीडमध्ये ३ लाख ८० हजार टन, उस्मानाबादमध्ये २.७७ लाख टन तर लातूर जिल्ह्यात ४ लाख २५२०० टन चारा आहे. त्यामुळे गरज नसल्यास चारा छावण्या नकोत, अशी भूमिका घेतली होती. पण लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानंतर एकही चारा छावणी बंद करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचे खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)