उद्यानातील अनधिकृत बांधकाम अखेर हटविले
By admin | Published: October 3, 2016 03:01 AM2016-10-03T03:01:16+5:302016-10-03T03:01:16+5:30
उद्यान बळकावण्याच्या प्रयत्नात केलेल्या अनधिकृत बांधकामाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर संबंधिताने ते बांधकाम हटवले आहे.
नवी मुंबई : उद्यान बळकावण्याच्या प्रयत्नात केलेल्या अनधिकृत बांधकामाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर संबंधिताने ते बांधकाम हटवले आहे. घणसोली विभाग अद्याप हस्तांतरणाच्या वादात अडकलेला असल्याची संधी साधत संबंधिताने हे बांधकाम केले होते. परंतु जलवाहिनीवर बांधलेली भिंत अद्याप तशीच असल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत रहिवाशांकडून संशय व्यक्त होत आहे.
घणसोली सेक्टर ५ येथील उद्यान बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. घणसोली विभाग अद्याप महापालिकेला हस्तांतर झालेला नाही. त्यामुळे सिडको व महापालिकेच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेत रहिवासी भरडले जात आहेत. गेली १५ वर्षे स्थानिकांना चांगले उद्यान, खेळाचे मैदान, चांगले रस्ते अशा सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. दोन प्रशासनातील लेटलतिफ कारभाराचा गैरफायदा घेत त्याठिकाणच्या उद्यानाची भिंत पाडून उद्यानाचा काही भाग बळकावण्याचा प्रयत्न त्याठिकाणी सुरू होता. ज्यांच्याकडून हा प्रकार केला जात होता, त्यांच्याकडून यापूर्वी देखील त्याठिकाणी नियमांचे उल्लंघन करत विनापरवाना बांधकाम झालेले आहे. त्यानंतरही सिडको व पालिका अधिकारी त्याठिकाणच्या अनधिकृत बांधकामाकडे डोळेझाक करत असल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. याला वाचा फोडत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच संबंधिताने स्वत:हून वाढीव बांधकाम हटवले आहे. परंतु उद्यानालगतच्या जलवाहिनीवर देखील संबंधिताकडून बांधण्यात आलेली भिंत तशीच आहे. त्यावर तरी प्रशासन कारवाई करेल का? व भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर ठोस कारवाई होईल का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)