चेंबूरमध्ये अनधिकृत मेळा
By admin | Published: October 31, 2016 05:43 AM2016-10-31T05:43:48+5:302016-10-31T05:43:48+5:30
चेंबूरमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत मेळा थाटला आहे.
मुंबई : पालिका, पोलीस आणि जागेचे मालक असलेल्या एसआरएची परवानगी न घेता, चेंबूरमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत मेळा थाटला आहे. तथापि, गेल्या तीन महिन्यांपासून रितसर परवानगी मागणाऱ्या येथील एका स्थानिक नेत्याला या ठिकाणी परवानगीच दिली जात नसल्याने, हा विषय सध्या चेंबूरमध्ये चर्चेचा बनला आहे.
शहरात कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी सर्व संंबंधित यंत्रणांची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानुसार, चेंबूरच्या वाशी नाका येथे मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी वाशी नाका दिवाळी महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. याबाबत परवानगीसाठी तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना काही परवानग्यादेखील मिळाल्या. मात्र, अन्य एका स्थानिकाने त्यांचा कार्यक्रम होऊ नये, तसेच कार्यक्रमाचे श्रेय घेण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता, येथे मेळा सुरू केला आहे. ही बाब जाधव यांना समजताच, त्यांनी तत्काळ याबाबत पालिका आणि पोलिसांकडे तक्रारी करून
हा अनधिकृत मेळा बंद करण्याची विनंती केली. मात्र, अजूनही
पोलीस, तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली नाही. जर कायदेशीर भाषा संबंधितांना समजत नसेल, तर आमच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा आता मनसेने दिला आहे. (प्रतिनिधी)