इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:31 AM2018-01-30T04:31:20+5:302018-01-30T04:31:32+5:30
केवळ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सेवानिवृत्त अधिकारी श्रीनिवास जाधव यांना खाजगी सचिव म्हणून नेमले नसून इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती काम करत आहेत, गोपनिय फाईली हाताळत आहेत, असा लेखी आक्षेप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे नोंदवला आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : केवळ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सेवानिवृत्त अधिकारी श्रीनिवास जाधव यांना खाजगी सचिव म्हणून नेमले नसून इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती काम करत आहेत, गोपनिय फाईली हाताळत आहेत, असा लेखी आक्षेप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे नोंदवला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांची यादी मुंडे यांना दिली असून त्यात मंत्र्यांना जेवढा स्टाफ मंजूर आहे त्यापेक्षा कितीतरी अधीक लोक प्रत्येक मंत्र्यांकडे काम करत असल्याचे दिसून येत आहे. मंत्र्यांकडे अनेक धोरणात्मक व गोपनीय बाबी हाताळल्या जातात. मात्र अनधिकृत व्यक्ती या फायली हाताळत असून हे अत्यंत गंभीर असल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे. महसूल मंत्री पाटील यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या गोष्टी यापुढे करु नयेत कारण त्यांच्या कार्यालयातील पान निवृत्त अधिकाºयांशिवाय हलत नाही, अशी प्रतिक्रीया विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
गुन्हे दाखल झालेले कार्यरत
मंत्री कार्यालयांमध्ये अनेकदा विभागीय चौकशी सुरु असलेले, गुन्हे दाखल झालेले, जामिनावर बाहेर आलेले अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याचे मुंडे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.