ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर आधारकार्डसाठी विनापावती वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:50 PM2017-09-07T21:50:34+5:302017-09-07T21:50:42+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्याकार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे.
ठाणे, दि. 7 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्याकार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. मात्र त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असून, त्याची पावती मात्र दिली जात नाही, याची तक्रार विटावा येथील नागरिकाने केल्यावर त्याचे सुमारे 30 रुपये मात्र परत केल्याचे आढळले आहे.
आधारकार्ड काढणे, जुन्या कार्डमधील चुकीच्या नावात, पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर संबंधित कंपनीला आधारकार्ड केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या केंद्रावर येथील एनआयसी विभागाचे मॉनिटरिंग असल्याचे चौकशीअंती कळाले. नागरिकांच्या सोयीसाठी या केंद्रावरून विनामूल्य आधारकार्डसंबंधी सेवा होणे अपेक्षित आहे. परंतु कामानुसार पैसे घेतले जात असून त्याची पावती दिली जात नाही, याशिवाय केलेल्या कार्डच्या दुरुस्तीचे प्रिंटही दिली जात नसल्याची तक्रार विटावा येथील नागरिक नामदेव वाघ यांनी तहसीलदार समीर घारे यांना केली.
या तोंडी तक्रारीस अनुसरून पावती देणे अपेक्षित असल्याचे घारे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी एनआयसीमधील आयटीच्या एका कर्मचा-याला वाघ यांना भेटायला सांगितले. संबंधित कर्मचा-याची वाघ यांनी आधार कार्ड केंद्रात बराच वेळ प्रतीक्षा केली. त्यानंतर घेतलेले 30 रुपये परत केल्याचे वाघ यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले. परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, शहर पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस मुख्यालय एवढेच नव्हे तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अशी मोठमोठी सरकारी कार्यालये असतानाही आधार कार्डसाठी नागरिकांकडून मनमानी पैसे घेण्याची भीती नसल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. यास वेळीच आळा न घातल्यास काही सामाजिक संघटना त्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.