मुंबईत सत्तांतराशिवाय विकास अशक्य- थरूर
By Admin | Published: January 31, 2017 02:18 AM2017-01-31T02:18:43+5:302017-01-31T02:18:43+5:30
मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या
मुंबई : मुंबईकरांनी तब्बल चारवेळा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना आणि भाजपा युतीच्या हाती सोपविली. तरीही मुंबईचा विकास करण्यात युती अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी यंदा महापालिकेत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल, असा दावाही त्यांनी केला.
युतीच्या कारकीर्दीतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने तयार केलेल्या आरोपपत्राचेही थरुर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना थरूर म्हणाले की, ‘वीस वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना सुखकर जीवन देण्यात शिवसेना, भाजपा साफ अयशस्वी ठरली. आता तर भाजपा नेते पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात पारदर्शकत कारभाराच्या आग्रहापोटी कॉंग्रेसने माहिती अधिकार कायदा आणला. पण, सत्तेवरील भाजपा सरकार माहिती अधिकारातही माहिती देत नाही. या सरकारला पंतप्रधानांची शिक्षणाची पदवी ते मुंबई महानगरपालिका यामध्ये कुठेही पारदर्शकता नको आहे, असा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षणच केले नाही. याचा आता मुंबईकरांनी जाब विचारायला हवा , असे थरूर म्हणाले.
यावेळी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही युतीच्या कारभारावर टीका केली. पालिकेतील सर्व भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यात भाजपाचाही तितकाच सहभाग होता. स्थायी समितीत भाजपाने शिवसेनेला मदत केली, मंजुरी दिली आणि आता युती तुटल्यावर भाजपा शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करतेय. मुख्यमंत्री म्हणतात पालिकेत भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारात भाजपचाही सहभाग आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
- अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भाजपा मंदिर बांधणार तरी कसे, निवडणुका आल्या की मतांसाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटण्यात येतो, असा आरोप शशी थरूर यांनी यावेळी केला.