भाजपामध्ये अस्वस्थता!

By admin | Published: December 8, 2015 02:35 AM2015-12-08T02:35:34+5:302015-12-08T02:35:34+5:30

विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत लपून राहिली नाही

Uncertainty in BJP! | भाजपामध्ये अस्वस्थता!

भाजपामध्ये अस्वस्थता!

Next

यदु जोशी, नागपूर
विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत लपून राहिली नाही. विरोधकांकडून हल्ले होत असताना आणि मित्र पक्ष शिवसेनेची भूमिका स्पष्ट नसताना सगळे घट्ट राहा, असा आदेश भाजपा आमदारांना आजच्या बैठकीत देण्यात आला.
विधान भवनातील भाजपाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्यासह सर्व मंत्री, आमदार उपस्थित होते. मित्र पक्ष शिवसेनेची भूमिका सरकारला सहकार्य करण्याची आहे की नाही, हे समजत नाही. ते प्रसंगी सरकारला अडचणीतदेखील आणू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आमदारांनी एकोप्याने राहिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
नागपूरचे अधिवेशन वादळीच होत असते. एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सरकारवर हल्ला झाला तर समोरच्यांना बोलू न देता आपण आक्रमक व्हा, असे आवाहन खडसे यांनी केल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर नाही तर डर कशाला? आम्ही कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. खोट्यानाट्या आरोपांचे भांडवल करायचे आणि आमची बदनामी करायची, हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जुना धंदा आहे. मी आणि माझे ज्येष्ठ सहकारी मंत्री एकेका आरोपाचे मुद्देसूद उत्तर देऊन त्यांना उघडे पाडू. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, तुम्ही चिंता करू नका.
विरोधी पक्षात असताना आमच्यापैकी ५० टक्के लोक बोलायचे आणि उरलेले ती भूमिका उचलून धरत आक्रमक व्हायचे. आता आपण सत्तेत आहोत. २० टक्के लोकांनी बोलायचे आणि ८० टक्क्यांनी त्याचे जोरदार समर्थन करायचे, असे चित्र सभागृहात दिसले पाहिजे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. उपाययोजनांबाबत काही ठिकाणी नाराजीही आहे पण सरकार अनेक उपाययोजना करीत आहे पण तरीही त्या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला सांगितल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तूरडाळीच्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांचे लक्ष्य असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, तूरडाळ घोटाळा आधी दोन हजार कोटींचा, चार हजार कोटींचा आणि आता तर आठ हजार कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे. एक पैशाचाही घोटाळा झालेला नाही, हे आपण सप्रमाण सिद्ध करू. प्रदेशाध्यक्ष दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही मार्गदर्शन केले.
लूज टॉक मत करो
भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी, ‘मीडिया के सामने लूज टॉक मत करो,’ असा सल्ला आमदारांना दिला. सरकारबद्दल तुमची काही मते असतील तर ती पक्षात मांडा, बाहेर बोलण्याची गरज नाही.
काही जण परस्पर मीडियाशी बोलतात आणि गैरसमज निर्माण होतात हे योग्य नाही, अशी कानउघाडणीही त्यांनी केली.

Web Title: Uncertainty in BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.