अस्वस्थता हीच कलाकृतीची प्रेरणा
By admin | Published: January 12, 2015 01:08 AM2015-01-12T01:08:31+5:302015-01-12T01:08:31+5:30
कलावंत समाज जीवनापासून वेगळा राहू शकत नाही. समाजाचे दु:ख, वेदना संवेदनशील कलावंताला अस्वस्थ करीत असते. त्यासाठी आपण शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो पण कलावंताला
आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट कलावंत वासुदेव कामत : चित्राची निर्मिती विश्वात्मक अनुभूती
नागपूर : कलावंत समाज जीवनापासून वेगळा राहू शकत नाही. समाजाचे दु:ख, वेदना संवेदनशील कलावंताला अस्वस्थ करीत असते. त्यासाठी आपण शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो पण कलावंताला या अस्वस्थतेतूनच प्रेरणा मिळते. ही अस्वस्थता असतानाच कलाकृतीला प्रारंभ केला पाहिजे. अस्वस्थता संपल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी तोच विषय कलाकृतीसाठी खास वाटत नाही. त्यामुळे कलावंतांनी अस्वस्थता येते त्याच क्षणी कामाला प्रारंभ करायला हवा, असा मंत्र आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट कलावंत चित्रकार वासुदेव कामत यांनी नव्या दमाच्या कलावंतांना दिला.
श्लोक प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर त्यांनी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करुन दाखविले. मॉडेलचे हुबेहूब पोर्ट्रेट त्यांनी साकार केल्यानंतर सारेच अवाकही झाले. या कलात्मक प्रवासाने त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. यात बहुसंख्येने नवोदित चित्रकारही होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांची कलाविषयक मते ऐकण्यासाठी एका छोटेखानी भाषणाचे आयोजन यावेळी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने नव्या चित्रकारांशी संवाद साधताना कामत बोलत होते.
कामत म्हणाले, या प्रदर्शनाचे श्लोक हे नाव मला खूप आवडले. या नावाला एक आध्यात्मिक परंपरा आणि आधार आहे. कलेच्या माध्यमातून कलावंत अमूर्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि काही वेळेला अमूर्ताला मूर्त स्वरूपात बांधण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच श्लोक हे नाव या कलाप्रदर्शनासाठी मला खूपच योग्य वाटले. कलासृजन आणि कला रसग्रहण या बाबी आपल्याला एकाग्रचित्त करणाऱ्या आहेत. कलासृजन असो वा रसग्रहण, या प्रसंगात आपण एकाग्र होतो, मग्न होतो आणि कला, कलावंत आणि रसिक यांचे अद्वैत साधले जाते. मुळात मानवी जीवन दु:खानेच भरले आहे. सकाळी खा. विजय दर्डा यांच्याशी बोलतानाही आमची मानवी जीवनातील दु:ख या विषयावरच चर्चा झाली. पण कला आपल्या दु:खाची तीव्रता कमी करीत असते. कलेचे तेच सामर्थ्य आहे. कलावंत सृजनासाठी आणि रसिक आस्वादासाठी कलेशी जुळला तर प्रत्येकालाच जीवन कृतार्थ झाल्याची अनुभूती मिळू शकते. त्यामुळे केवळ सृजनच नव्हे पण आस्वादासाठी कलेशी आपण जुळलो तर जीवन अधिक सुंदर होऊ शकते. कलेची ही शक्ती कलावंताला ठाऊक असते त्यामुळेच कलावंत प्रतिकूलतेतही जीवनातील दु:ख सहज पचवू शकतो आणि अभिव्यक्त होत राहतो. त्याच्या चित्रावर असलेली त्याची स्वाक्षरी हे इतिहासाचेच डाक्युमेन्टेशन असते. कलाकृती पूर्ण झाल्यावर मात्र कलावंताची कलाकृतीशी असणारी नाळ तुटते. त्यानंतरच्या पिढ्यांनी ती कलाकृती सांभाळून ठेवली तर कलावंतापेक्षा कलाकृतीचेच आयुष्य मोठे होते. इतिहास म्हणजे केवळ पुस्तकाची पाने नसतात. इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्राचीन वास्तू आणि कला, पेंटिंग्ज ही इतिहासाचीच पाने असतात. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी कलाकृती हे कलावंताचे कर्तव्यच ठरते. अनेक लोक विचारतात तुम्ही चित्र का काढता, त्यावर मी सांगतो, चित्रकार आहे म्हणून चित्र काढतो. पण आपण चित्र का काढतो, असा प्रश्न स्वत:लाच विचारल्यावर मात्र त्याचे विलक्षण उत्तर येते. खरे तर कलावंत चित्र काढत नसतो तर चित्र काढले जाते. ही एक विलक्षण आणि विश्वात्मक अनुभूती असते. या अनुभूतीतून मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा जेव्हा देहात कार्यान्वित होते, तो क्षण विचक्षण असतो, अतिशय वेगळा असतो. त्याला शब्दात बांधता येत नाही आणि चित्रात अभिव्यक्तही करता येत नाही. काहीतरी निसटल्यासारखेच वाटते. हाच मूर्त साक्षात्कार आपल्याला हवा असतो म्हणून कलावंत काम करीत राहतो. त्याचे खरे तर कलावंताला समाधानही असते. पण कलावंताचे असमाधान होते तेव्हा आपली चूक शोधण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होतो. यासाठी अभ्यास हवा, प्रगल्भता हवी, शिस्त हवी. शिस्त प्रथम स्वत:ला लावून घ्यावी लागते आणि त्यानंतर ती अंगवळणी पडली की, त्याची सवयही होते. आपले समाधान मात्र इतरांना दु:ख देणारे असेल ते चुकीचे आहे. याचा विचार कलावंतांनी करायला हवा. आपल्या कलाकृतीतून कुणालाही वेदना होता कामा नये.
याप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा, उद्योगपती मनोज जयस्वाल, अभिजित जयस्वाल, कोमल अभिजित जयस्वाल, नीना जैन, रीतू जैन, निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा, भाजपाचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल कोटेचा, डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे, मैत्री परिवार संस्थेचे संस्थापक चंदू पेंडके, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंग, उद्योजक मोहब्बतसिंग तुली, सामाजिक कार्यकर्ते रणजित बघेल, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रफुल्ल क्षीरसागर, माजी अधिष्ठाता गुणवंत देवघरे, केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाचे सहायक संचालक सुरेंद्र मसराम, ज्येष्ठ सामाजिक नेते उमाकांत अग्निहोत्री, किरण दर्डा, उषा सुराणा, विजय सुराणा, डॉ. विनोद बोरा, अॅड. रमेश दर्डा, विजय क्षेत्रपाल, प्रेम लुणावत, किरण चावला, डॉ. संजय दर्डा, डॉ. अनिता दर्डा, वरदान बोरा, रिचा बोरा, सेजल शाह, नीरज शाह, डॉ. रामकृष्ण शेणॉय, डॉ. प्रतिमा शेणॉय, उद्योगपती दिलीप छाजेड, दीपक देवसिंघानी, प्रकाश बेतावार, प्रा. मारोती शेळके, अंजली बावसे, बिपीन सुळे, अजय पालतेवार, रवी हरदास, डॉ. रवी गांधी, डॉ. शैला गांधी, चंद्रकांत सोनटक्के, कर्नल सतीश बोलाखे, वंदना बोलाखे, यशवंत काशेट्टीवार, उद्योजक राजू कुणावार, कल्पना कुणावार, माणकचंद सेठीया, अशोक शॉ, कुणाल शॉ, सेजल शॉ, प्रेरणा गुप्ता, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे क्युरेटर मिलिंद लिंबेकर, नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे प्रा. विजय रुद्रकार, प्रा. योगेश अडकिणे, प्रा. अतुल कामडी व विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चित्रकारांनीही रियाज करायला हवा
मनात ज्यावेळी विचार येतो त्याला त्वरित कृतीची जोड देता आली पाहिजे. अन्यथा तोच विचार नंतर आपल्याला खास वाटत नाही आणि कलाकृतीचे पोटेन्शियल संपते. हा रियाजाचाच भाग आहे. पं. जसराज यांच्याकडे गेलो तेव्हा ते अस्वस्थ होते. कारण विचारल्यावर त्यांनी आज रियाज झाला नाही, असे कारण सांगितले. त्याशिवाय मैफिल रंगत नाही. चित्रकारांनीही हा रियाज करणे आवश्यक आहे. चित्रकारांनी केवळ सबमिशनसाठी काम करू नये. प्रमाणपत्र मिळविल्याने काम मिळत नाही तर काम पाहून काम मिळते. यातून व्यावसायिक दृष्ट्याही स्टेबल होता आले पाहिजे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी स्वत:ला झोकून द्यावे
आपले क्रिएशन हे समाजाचे आहे. ते समाजाला अर्पण करून आपण दुसऱ्या कलाकृतीक डे वळायला हवे. विद्यार्थी दशा पुन्हा येत नाही त्यामुळे या काळात स्वत:ला झोकून द्या आणि काम करा, असे ते म्हणाले. एक लाईन सापडली की ती कलावंतांना आयुष्यभर पुरते कारण अनुभव आपल्याला खूप शिकवित जातात. त्यामुळेच भगवान बुद्धाची ३५ चित्रे झाली, गजराजाची ३० चित्रे झाली पण माझी मालिका संपत नाही. हा प्रवास निरंतर चालत राहतो, असे ते म्हणाले.
पोर्ट्रेट ही संकल्पनाच
खूप व्यापक
‘आॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग’ मला आवडतात. पण मी पोर्ट्रेैट करतो. रिअॅलिस्टीक काम हे कौशल्य दाखविण्यासाठी नाही आणि पोर्ट्रेट म्हणजे केवळ एखाद्या मॉडेलचे चित्र नाही. पोर्ट्रेट ही संकल्पनाच खूप व्यापक आहे. संबंधित काळ आणि त्या प्रसंगानुरुप बोध सांगण्याचा माझा प्रयत्न पोर्ट्रेट मधून असतो. मी पौराणिक प्रसंगातून वास्तववाद शोधण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करतो, असे बोलले जाते. पण पौराणिक चित्रांपेक्षा अनेक वेगळी चित्र मी केली आहेत. त्या प्रसंगातील मला भावलेला संस्कार इतरांपर्यंत संक्रमित करण्याचा माझा सुप्त प्रयत्न असतो. मी रामायणावरचे चित्र काढले पण त्यात माझ्या मनातील बालपणापासूनचा रामायणातील संस्कार होता. तो व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न मी केला आहे. त्यामुळे चित्रांच्या अधिक खोलात गेले पाहिजे, असे ते म्हणाले. रामायणातील माझे ते चित्र म्हणजे केवळ रामायणातील दृश्य नव्हते. त्या चित्रातून चित्रकाराला काही वेगळे सांगायचे असू शकते.
चित्रांचा अर्थ रसिकांनी
समजून घ्यावा
चित्रकार हा संवेदनशील असतो आणि आजूबाजूच्या घडामोडींचा त्याच्यावर परिणाम होत असतो. कच्छचा भूकंप २६ जानेवारी रोजी झाला तेव्हा मी त्यावर चित्र काढले. शाळेत गेलेली मुले या भूकंपात मृत्युमुखी पडली. त्यामुळे मला आलेली अस्वस्थता मी जमिनीतून मुलांचे केवळ पंजे बाहेर आलेले आणि ध्वजवंदनासाठी ते ध्वजाच्या खांबाला स्पर्श करू पाहात आहेत, हा आशय मांडला. वासांसी जीर्णानी हे पौराणिक चित्र होेते पण त्यातून क्रांतिकारकांनी दिलेले बलिदान आणि त्यानंतर होणारा सूर्यास्त हा इंग्रजांच्या साम्राज्यावरून झालेला सूर्यास्त दाखविण्याचा आशय होता. त्यामुळेच चित्रांना पटापट एखाद्या वर्गवारीत न टाकता त्या चित्रांचा अर्थ रसिकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.