राणेंच्या हालचालींमुळे शिवसेनेत अस्वस्थता
By admin | Published: April 14, 2017 01:41 AM2017-04-14T01:41:19+5:302017-04-14T01:41:19+5:30
एकेकाळचे शिवसैनिक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. कारण, राणे भाजपात गेले
मुंबई : एकेकाळचे शिवसैनिक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. कारण, राणे भाजपात गेले तर कोकणमध्ये शिवसेनेच्या सामर्थ्याला भाजपाकडून मोठे आव्हान उभे राहू शकते.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा भाग शिवसेनेचा प्रभावपट्टा राहिला आहे. या भागातील कोकणी माणूस परंपरेने शिवसेनेबरोबर राहिला. मात्र, राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर विशेषत: कोकणात शिवसेनेसमोर एक आव्हान उभे राहिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये राणे फॅक्टरचा फटका शिवसेनेला बसला. अलीकडे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ताही आणली.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेने पराभव केला. मात्र, त्यांचे पुत्र नितेश आमदार झाले. दुसरे पुत्र नीलेश आधीच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. असे असले तरी राणे हे कोकणातील महत्त्वाचे नेते आहेत आणि ते उद्या भाजपात गेले तर सध्या या भागात अस्तित्वहिन असलेल्या भाजपाला संजीवनी मिळणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वर्चस्वाच्या लढाईत भाजपाच्या हाताशी या भागात इतकी वर्षे फारसे काही लागलेच नाही.
आता राणे भाजपात गेले तर पक्षाला तेथे भक्कमपणे पाय रोवण्याची संधी मिळेल. ही बाब शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते. राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत असताना शिवसेनेने मात्र कोणतीही प्रतिक्रिया आज दिली नाही. ‘नो रिअॅक्शन,’ एवढेच शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणाले.
तथापि, सूत्रांनी सांगितले की, राणे भाजपात गेल्यास कोकणात शिवसेनेची रणनीती काय असावी याबाबत शिवसेनेत चर्चा सुरू झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)
तो प्रभाव आज नाही
- नारायण राणे २००५मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसवासी झाले तेव्हा मोठा राजकीय भूकंप झाला होता. ते तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
या वेळी ते भाजपात गेले तर त्यांचा मुलगा वगळता अन्य कोणी आमदार काँग्रेस सोडेल काय याबाबत साशंकताच आहे. तसेच प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी राणेंसोबत जातील, अशीही शक्यता नाही.