सहाव्या उमेदवारामुळे आघाडीमध्ये अस्वस्थता
By admin | Published: June 2, 2016 02:29 AM2016-06-02T02:29:37+5:302016-06-02T02:29:37+5:30
विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार आरामात निवडून येत असताना भाजपाने पाचऐवजी सहा उमेदवार उभे केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांवर तर त्यांचा डोळा नाही
यदु जोशी, मुंबई
विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार आरामात निवडून येत असताना भाजपाने पाचऐवजी सहा उमेदवार उभे केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांवर तर त्यांचा डोळा नाही ना, या चर्चेला उधाण आले आहे.
आधी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या मूडमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचा सहावा अधिकृत उमेदवार देत काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन प्रमुख विरोधी पक्षांना गोंधळात टाकले आहे. मतदान गुप्त असल्याने काही धोका तर होणार नाही ना या शंकेने आता मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, राष्ट्रवादीमध्ये रामराजे निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याने आतल्या आत नाराज असलेल्यांना चाचपण्याचे काम भाजपाने सुरू केले आहे. छोटे साहेब, मोठे साहेब यांच्या समर्थकांमधील हे अंतर्गत राजकारणाचे पदर उलगडून पाहिले जात आहेत. मुंबईतील एक वजनदार मंत्री आणि पुण्यातील एका नेत्याला भाजपाने चाचपणीसाठी कामाला लावले आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणे उद्या विधिमंडळात आले तर ते वरचढ होतील या भीतीने त्यांचा प्रवेश रोखण्याची सुप्त इच्छा असलेल्या काँग्रेसमधील काही आमदारांना भाजपाकडून गोंजारले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या क्षणापर्यंत चाचपणी करून काँग्रेस-राष्ट्रवादीची काही मते गळाला लागतात का याचा प्रयत्न केला जाणार आहे. तो सफल होत असल्याचे दिसले आणि अपक्ष व लहान पक्षांची मते मिळणार असे दिसले तर भाजपा आपले सहाही उमेदवार कायम ठेवेल. अन्यथा, एकाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल.
भाजपाचा सहावा उमेदवार कायम राहिला तर राष्ट्रवादी वा काँग्रेसची पंचाईत होऊ शकते. विधान परिषदेचे उपसभापतीपद भाजपाला देणार असाल तर आमचा सहावा उमेदवार मागे घेऊ, असे दबावतंत्रही भाजपाकडून वापरले जाऊ शकते.मनसेतून भाजपात आलेले आणि मुंबई जिल्हा बँकेतील घोटाळ्याचे आरोप असलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या कृपेखाली अनेक वर्षे राहिलेले वादग्रस्त आर.एन. सिंह आणि राष्ट्रवादीतून अलीकडेच भाजपात उडी घेतलेले प्रसाद लाड या तिघांना भाजपाने उमेदवारी दिल्याची तीव्र प्रतिक्रिया आजदेखील पक्षात उमटली.सोशल मीडियावर टीकेचा पूर आला होता. सूत्रांनी सांगितले की, या तिघांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे आणि तिघांच्या कर्तृत्वाचे ‘वर्णन’ करणाऱ्या एसएमएसचा मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मोबाइलवर अक्षरश: पाऊस पडल्याची माहिती आहे.