बेशुद्धावस्थेतच घेतली पत्नीची तलाकनाम्यावर सही
By admin | Published: October 1, 2014 12:44 AM2014-10-01T00:44:17+5:302014-10-01T00:49:21+5:30
खसमगाव येथील प्रकार, दुसरी मुलगी झाल्याने पतीची नाराजी.
अनिल गवई/खामगाव
दुसरी मुलगी जन्मली म्हणून तिचा जन्म झाला त्यादिवशीच, पत्नीची बेशुद्धावस्थेत तलाकनाम्यावर सही घेतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही दुर्दैवी महिला खामगावची असून, आधुनिक युगातही लिंगभेद काहींच्या मनात खोलवर रूजला असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.
खामगाव शहरातील ताज नगर भागातील शबाना (काल्पनिक नाव) हिचा विवाह राजस्थानातील एका युवकाशी झाला होता. तिला पहिली मुलगी झाली आणि सासरकडील मंडळीच्या वागणुकीत कमालीचा बदल झाला. मुलगी जन्माला आल्यामुळे सासरकडील मंडळीने तिला हिणवण्यास सुरूवात केली. दरम्यान, मुलीचा संसार टिकावा म्हणून शबानाचे सावत्र वडिल आणि आईने सासरकडील मंडळीची समजूत घातली. स्वत:जवळ जमा असलेले थोडेफार पैसे सासरच्या मंडळीला दिले. त्यानंतर काही दिवस शबानाचा संसार व्यवस्थित चालला; मात्र तिला दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर परिस्थिती बिघडली. दुसर्या मुलीमुळे भ्रमनिरास झालेल्या शबानाच्या पतीने मुलीच्या जन्माच्या दिवशीच दवाखान्याच्या कामाचे निमित्त करून शबानाची एका कागदावर सही घेतली. त्यावेळी शबाना जवळपास बेशुद्धावस्थेत होती. वास्तविक पतीने तिची सही घेतलेला तो कागद म्हणजे तलाकनामा होता. त्यानंतर त्याने शबानाच्या माहेरच्या मंडळीना बोलावून घेतले. त्यानुसार शबानाची आई आणि सावत्र वडिल राजस्थानला गेले. बाळ -बाळांतिनला घेवून त्यांनी खामगाव गाठले. मुलीला माहेरी नेण्यासाठी काही पैसेही सासरकडील मंडळीनी शबानाच्या आईकडे दिले. शबाना आपल्या दोन्ही मुलींसह खामगावात आल्यानंतर दोन दिवसांनी, पतीचा फोन आला. पतीचे म्हणणे ऐकून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने आपल्या १२ दिवसांच्या चिमुकलीसह थेट पोलिस स्टेशन गाठून, विश्वासघाताने आपली तलाकनाम्यावर सही घेतल्याचे पोलिसांना सांगितले. खामगाव पोलिसांनी हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्राकडे सुपूर्द केले असून, तलाकनाम्यावर सही केल्याने आता शबानाला कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरच न्याय मिळणे शक्य होणार आहे.
येथील महिला तक्रार निवारण केंद्राच्या समुपदेशक स्वाती इंगळे यांनी बेशुद्धावस्थेत तलाकनाम्यावर सही घेतल्याचे एक प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्राकडे आले असल्याचे सांगीतले. दुसरी मुलगी जन्माला आल्याने घटस्फोट देण्यात आल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे असल्याचे सांगीतले.