विविध प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक करणार अनवाणी अध्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 03:29 AM2017-09-05T03:29:23+5:302017-09-05T03:29:32+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ सप्टेंबर रोजी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनवाणी अध्यापनाद्वारे निषेध आंदोलन करणार आहेत.
मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ सप्टेंबर रोजी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनवाणी अध्यापनाद्वारे निषेध आंदोलन करणार आहेत. तसेच ५ सप्टेंबरला दिल्लीत आॅल इंडिया फेडरेनशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (एआयफुक्टो) ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने फक्त १ हजार ६२८ शाळांना २० टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक ‘आत्मक्लेष दिन’ म्हणून पाळणार आहेत. तसेच ते ६ सप्टेंबरला अनवाणी अध्यापन करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. एआयफुक्टोनेही ५ सप्टेंबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई विद्यापीठासह राज्यातील, इतर विद्यापीठांतील प्राध्यापक त्यांच्या विविध मागण्यांसाठी यात सहभागी होणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली.