पावसाअभावी अघोषित भारनियमन
By admin | Published: July 14, 2015 01:35 AM2015-07-14T01:35:29+5:302015-07-14T01:35:29+5:30
पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली.
मुंबई : पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली. मागणी व पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी सोमवारी महावितरणकडून राज्यात काही प्रमाणात अघोषित भारनियमन करण्यात आले.
राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, कृषीपंपाचा वापर वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्याची असलेली १३ हजार ५०० ते १४ हजार मेगावॅट विजेची मागणी अचानक वाढून ती १६ हजार ते १६ हजार ५०० मेगावॅटपर्यंत गेली. महानिर्मितीचे परळीमधील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ४ हजार ५०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ ३ हजार ८०० मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. शिवाय पवन ऊर्जेतूनही १ हजार ८०० ते २ हजार २०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ १ हजार मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. तिरोडामधील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ आणि अमरावतीमधील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नाही. त्यामुळे राज्यात सकाळी पावणे दहा वाजता काही ठिकाणी भारनियमन करण्यात आले.
कोयनामधील २५० मेगावॅटचा संचही सुरू झाल्याने विजेची उपलब्धता वाढल्याने सायंकाळी उशिरापर्यंत भारनियमनाचे प्रमाण कमी झाले. या सर्व बाबी लक्षात घेता महावितरणने कृषीपंपाचे भारनियमन करण्यात येणार नाही, अशी दक्षता घेतली आहे. त्यांना निश्चित असलेला वीजपुरवठा सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)
मागणीत मोठी वाढ
केंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही तीव्रतेत तफावत दिसून आली. परिणामी, भारनियमनाचे प्रमाण वाढले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्सचेंजमधून १ हजार ते १ हजार २०० मेगावॅट वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भारनियमन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.