जादूटोणाविरोधी कायद्यान्वये कथित देवी सहकाऱ्यासह पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Published: October 10, 2016 06:18 AM2016-10-10T06:18:08+5:302016-10-10T06:18:08+5:30
अंगात दैवीशक्ती संचारल्याचे भासवून परिसरात गोंधळ घालणाऱ्या कथित देवीला तिच्या एका सहकाऱ्यासह रामनगर पोलिसांनी अटक
वर्धा : अंगात दैवीशक्ती संचारल्याचे भासवून परिसरात गोंधळ घालणाऱ्या कथित देवीला तिच्या एका सहकाऱ्यासह रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गजानननगर परिसरात शनिवारी रात्री करण्यात आली. दोघांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, गजानननगर परिसरातील सागर संजय उईके याच्या घरी नवरात्रोत्सवादरम्यान घटस्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता देवळी तालुक्यात वाटखेड येथे राहणारी सागरची मावशीही आली. सागर व त्याच्या मावशीच्या अंगात कथित देवी संचारण्याचा प्रकार सुरू झाला. शुक्रवारी या प्रकाराने चांगलाच गोंधळ झाला. चार भिंतीच्या आत असलेली ‘देवी’ काही काळातच रस्त्यावर आली. या दोघांनी त्यांचे वैमनस्य असलेल्यांना शिवीगाळ करणे सुरू केले. नंतर तिने सागरला अंगावरील कपडे काढण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच त्याने निर्वस्त्र होत परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. या वेळी त्याने कथित देवीच्या नाकाचा चावा घेत तिला रक्तबंबाळ केले. यावरून दोघांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकाराची माहिती रामनगर पोलिसांच्या चार्ली पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. या पथकाने दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध झाल्याने अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. अंनिसचे पंकज वंजारे यांच्या मदतीने या कथित देवीला व तिच्या सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भादंविच्या कलम १६०, ३२३ व जादूटोणाविरोधी कायद्याच्या अनुसूची ५ प्रमाणे ३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)