शनिशिंगणापूर देवस्थान सरकारच्या नियंत्रणाखाली, स्वतंत्र कायदा करण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:41 AM2018-06-21T06:41:15+5:302018-06-21T06:41:15+5:30
शिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम करून, उत्तम सोयी देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई : शिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम करून, उत्तम सोयी देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसे विधेयक पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल. कायद्यान्वये विश्वस्तांची नियुक्ती करणे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे अधिकार राज्य सरकारकडे राहतील. देवस्थानाच्या काही विश्वस्तांची अनियमितता व गैरव्यवहार, तसेच विश्वस्तांच्या नियुक्ती याबाबत तक्रारी आल्या होत्या. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही तिथे घडल्याने हा निर्णय झाला.
>नवीन कायद्यामुळे श्री शनैश्वर देवतेच्या धार्मिक प्रथा व परंपरा जपून दर्शन व्यवस्थेबाबत आता भेदभाव नष्ट करून एकसंघता आणण्यात येईल. दानाच्या निधीतून भक्तांसाठी अधिक सोईसुविधा निर्माण केल्या जाताली आणि अतिरिक्त निधीतून समाजोपयोगी शैक्षणिक व वैद्यकीय कार्य केले जाईल.
>भाविकांच्या सोयीकडे देणार लक्ष
अस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन कायद्यान्वये श्री शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे. तिथे भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या प्रमाणात याठिकाणी सोईसुविधा निर्माण करणे आवश्यक होते, असे सांगण्यात आले.