उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
By admin | Published: May 19, 2014 03:22 AM2014-05-19T03:22:36+5:302014-05-19T03:22:36+5:30
शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गवासानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने तीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता.
नंदकुमार टेणी, ठाणे - शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गवासानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने तीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. जनता त्यावर शिक्कामोर्तब करते की त्यांना जनाधारापासून विन्मुख करते, त्याचप्रमाणे राज की उद्धव, या सामन्यात जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, अशा प्रश्नांची उत्तरे ही निवडणूक देणार होती. निवडणुकीच्या निकालाने जनतेने उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले तर राजविरुद्धच्या सामन्यातही विजयी केले. त्यामुळे उद्धव यांचा प्रभाव पक्षात आणि पक्षाबाहेरही वाढला. शरद पवार आणि अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आधी स्वत:चा पक्ष धड चालवा, मनोहर जोशी, मोहन रावले आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचा मान राखा, पक्षाला लागलेली गळती रोखा, असे टोले हे काका-पुतणे उद्धव यांना लगावत होते. या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची दुकानदारी संपुष्टात येईल, अशा वल्गनाही अजित पवार यांनी केल्या, तर पुतणे राज यांनी मृत्युशय्येवरील शिवसेनाप्रमुखांचा बटाटेवडा आणि चिकनचे सूप जाहीर सभेत उचकून काढले होते व औकात दाखवण्याची भाषा केली होती. तर उद्धव यांनी या सगळ्या प्रचाराला अत्यंत संयमी उत्तर दिले. शरद पवारांकडे स्वत:चे आहे काय? यांनी पक्ष काढला तो दोन्हीवेळा काँग्रेस फोडून. त्यांचे जे प्रमुख शिलेदार आहेत, ते कोण आहेत? गणेश नाईक, छगन भुजबळ, किरण पावसकर आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतल्या तिघांना इम्पोर्ट करून त्यांनी उमेदवार्या दिल्या आहेत. यांनी पुतण्या आणि मुलगी सोडली तर नेता म्हणून घडविले तरी कोणाला, असा सवाल उद्धव यांनी केला होता.