राज्यात कुष्ठरुग्ण शोध मोहिमेंतर्गत आढळले नवे सहा हजार १०० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:19 AM2020-01-31T01:19:17+5:302020-01-31T01:19:27+5:30
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत या वर्षी ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे घोषवाक्य असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : राज्यात सध्या १३ हजार ८१५ कुष्ठरुग्ण उपचाराखाली आहेत. दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी दोन आठवड्यांची कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू केली जाते. गेल्या वर्षी सुमारे साडेसात कोटी नागरिकांची या मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नव्याने ६ हजार १०० रुग्ण आढळले. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांतील रुग्णांचा तर पालघर, ठाणे, उस्मानाबाद, लातूर येथूनही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत या वर्षी ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे घोषवाक्य असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत. राज्यभर कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त १३ फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारमार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम आॅक्टोबर २०२० पर्यंत राबविण्यात येत आहे. दरवर्षी ३० जानेवारीला ‘कुष्ठरोग निवारण दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणीवजागृतीसोबतच कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती समाजातील विविध घटकांना देण्यात येत आहे.
स्पर्श अभियानासाठी समन्वय समिती
- पंधरवड्यानिमित्त ग्रामसभा घेण्यात येत असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाचे वाचन केले जात आहे. सरपंच अथवा गावातील मान्यवर या वेळी कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन करतील. गावातील ज्येष्ठ व्यक्ती महात्मा गांधीजींची वेषभूषा करून त्यामार्फत कुष्ठरोग निर्मूलनविषयक संदेश देतील. कुष्ठरोगाबाबत शंकानिरसनही या वेळी केले जाईल.
- गावात कुष्ठरोगी असल्यास त्यांच्यामार्फत ग्रामसभेत आभार प्रदर्शन करण्यात येईल. जनजागृती कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी संदेश दिला जाईल. स्पर्श अभियान राबविण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका समन्वय समिती करण्यात आल्या आहेत, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.