शिवसेनेचा अंतर्गत कहल, अभिषेक घोसाळकरांना तक्रार मागे घेण्याचे आदेश
By admin | Published: January 24, 2017 02:12 PM2017-01-24T14:12:53+5:302017-01-24T14:16:37+5:30
आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेनेच्या तीन नगरसेवकांविरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी, असा आदेश शिवसेने पक्षाकडून देण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - शिवसेना पक्षाचा दहिसरमधील अंतर्गत कलह चिघळण्याची शक्यता आहे. आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेनेच्या तीन नगरसेवकांविरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेच्या शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्याविरोधात बोरिवलीतील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही तक्रार मागे न घेतल्यास, शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकरांना कारवाईसंदर्भातील नोटीस पाठवण्यात येणार आहे.
अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीमुळे तीनही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
काय आहे नेमकी तक्रार?
दहिसरच्या एलआयसी कॉलनीत एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेत त्याचे नूतनीकरण केले. यासाठी माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ, अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरण्यात आला. 'कर्मयोग' नाव असलेल्या या उद्यानाचे 10 जानेवारी रोजी उद्घाटन झाले. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यानंतर 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिकांनी या उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावर अभिषेक घोसाळकर यांनी आक्षेप घेत आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले, असा दावा केला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचे सांगत कार्यक्रमातील उपस्थितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती.