साखरेचे दर तीन हजारांच्या आत, कारखानदारी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:15 AM2018-01-18T04:15:47+5:302018-01-18T04:15:49+5:30
घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत.
चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. यामुळे साखर कारखानदारांची चिंता वाढली असून दर वाढण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पावले उचलली नाहीत, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा उसाचे उत्पादन चांगले असल्याने देशात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. साखरेची मागणीही जवळपास २५० लाख टन आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा कमी म्हणजे २०३ लाख टन इतके झाले होते. परिणामी, गेल्यावर्षी साखरेचे घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल चार हजारांपर्यंत, तर किरकोळ बाजारातील दर ४५०० रुपयांवर गेले होते. त्यावेळी सरकारने हस्तक्षेप करून दरवाढ रोखली.
हे दर सरासरी प्रति क्विंटल ३६०० आणि किरकोळ बाजारातील प्रति किलो ४० ते ४२ रुपयांच्या
दरम्यान राहतील, याची दक्षता
घेतली होती.
साखरेचा शिल्लक साठा आणि चालू हंगामातील अपेक्षित उत्पादन लक्षात घेता यंदा दर आॅक्टोबरपासूनच घसरू लागले. ही घसरण ३५०० वरून २९५० रुपयांपर्यंत झाली आहे. ती १५ टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे कारखान्यांना एफआरपी अधिक २०० रुपये हा दर देणे अवघड बनले आहे. घसरण अशीच चालू राहिली, तर देशातील साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी साखरेचे किरकोळ बाजारातील दर ४० ते ४२ रुपयांच्या वर जाऊ नयेत, यासाठी केंद्राने उपाय योजले होते. तशीच उपाययोजना आता दर घसरू नयेत, यासाठीही सरकारने केली पाहिजे. अन्यथा, साखर कारखानदारीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत येईल.
- विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ.