दीपनगरात वीज निर्मिती पूर्ववत
By Admin | Published: October 20, 2016 06:56 PM2016-10-20T18:56:04+5:302016-10-20T18:56:04+5:30
१७ सप्टेंबर पासून बंद असलेली महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती आज पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता अभय हरणे यांनी ‘लोकमत’ला दिली
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. २० : १७ सप्टेंबर पासून बंद असलेली महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती आज पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता अभय हरणे यांनी ‘लोकमत’ला दिली. महाजनकोकडून दीपनगर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार कार्यान्वित करण्यासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश आज सकाळी सहा वाजता प्राप्त झाल्याचे हरणे यांनी सांगितले.त्यानुसार संच क्रमांक चार हा कार्यान्वित करण्यात आला आहे शिवाय ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच पहाटे कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महिनाभर वीज निर्मिती होती ठप्प
तब्बल महिनाभर दीपनगरातील वीज निर्मिती बंद होती.त्यामुळे रेल्वेसह अन्य उद्योगांना याचा फुटका बसला होता. कोळसा वाहतूक होत नसल्याने रेल्वेला दिवसाला दहा कोटी रुपयांचे नुकसान होत होते. शिवाय वीज निर्मिती होत नसल्याने राखेची वाहतूक बंद होती.सुमारे १०० बल्कर वाहने महामार्गावर ठिकठिकाणी थांबून होती. हजारो कामगार हातावर हात धरुन बसले होते. वीज निर्मिती पूर्ववत झाल्याने कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कामगार संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे.
एलडीकडून आदेश प्राप्त
दरम्यान, कळवा येथील लोड डिसपॅच सेंटरकडून (भारनियमन केंद्र) आधी संच क्रमांक चार कार्यान्वित करण्याचे आदेश आले आहेत.त्यानंतर पहाटे संच क्रमांक पाच सुरू करण्याचे आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.लवकरच संच क्रमांक तीनही सुरू होण्याची शक्यता आहे.
दीपनगर पुन्हा गजबजणार
महिनाभर थंड असलेले दीपनगर शुक्रवारपासून पुन्हा गजबजायला लागेल.कंत्राटी कामगारांनाही त्यांचे नेहमीचे काम मिळेल.
वीज निर्मिती सुरू झाल्याने कोळशाचे रेकची संख्या वाढणार आहे.त्याचा फायदा रेल्वेला होणार आहे. सीमेंट प्रकल्पही पुन्हा सुरू होणार आहे.
मागणी वाढल्याचा परिणाम
दरम्यान,पाऊस थांबला आहे.कडक उन पडत आहे.त्यामुळे राज्याची वीजेची मागणी वाढली आहे.ती आज तब्बल १८ हजार मेगावॅट इतकी वाढली आहे.त्यामुळेच बंद पडलेले वीज निर्मिती संच कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तापीनदीचे मुबलक पाणी, भरपूर कोळसा आणि श्रम असताना या वर्षी दीपनगरातील वीज निर्मिती प्रथमच बऱ्याचदा बंद पडली.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.