इंग्रजीतील तंत्रभाषा समजण्यासाठी...

By admin | Published: April 8, 2017 11:55 PM2017-04-08T23:55:32+5:302017-04-08T23:55:32+5:30

पुण्या-मुंबईत मुलांना इंग्रजी माध्यमातले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण समजत नसल्याने काही हजाराच्या संख्येने पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी

To understand the language of the English language ... | इंग्रजीतील तंत्रभाषा समजण्यासाठी...

इंग्रजीतील तंत्रभाषा समजण्यासाठी...

Next

- अ. पां. देशपांडे

पुण्या-मुंबईत मुलांना इंग्रजी माध्यमातले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण समजत नसल्याने काही हजाराच्या संख्येने पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे. गेल्या २५-३० वर्षांत आपण समाजात एक चुकीचा संदेश पाठवला आहे. त्याला आपण सगळे जण समाज म्हणून जबाबदार आहोत. तो असा की, जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी माध्यमात मुलांना घातले पाहिजे. हे जर खरे असेल तर मला सांगा, की डॉ. अनिल काकोडकर आणि प्रा. जयंत नारळीकर हिंदी माध्यमातच शिकले ना? डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. ज्येष्ठराज जोशी, डॉ. विजय भटकर, विजय तेंडुलकर, नाना पाटेकर हे मराठी माध्यमातच शिकले ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराती माध्यमात, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व कानडी माध्यमातच शिकले ना? पडले का ते जगाच्या स्पर्धेत मागे? तुम्ही दहावीपर्यंत प्रादेशिक भाषेत शिका आणि मग इंग्रजी माध्यम घ्या. तरीही भारतभरच्या सगळ्या ग्रामीण भागांत अकरावीत महाविद्यालयात आलेल्या मुलांना एकदम इंग्रजी माध्यम पेलवत नाही. त्यासाठी प्राध्यापकांना प्रादेशिक भाषांतून विषय समजावून द्यावे लागतात. पण प्राचार्य शिक्षकांना धमकावतात, की त्यांना इंग्रजीतूनच शिकवा. आज जड जाईल, पण उद्या समजेल. मग या बिचाऱ्या शिक्षकांना खास मुलांच्या आग्रहाखातर प्रादेशिक भाषांतून शिकवावे लागते.
रिक्षावाला- टॅक्सीवाल्याशी, दुकानदाराशी आपण हिंदीत नाहीतर इंग्रजीत बोलतो. व्यापारात मराठी बोलले पाहिजे. एक उत्तर भारतीय रिक्षावाला म्हणाला, हम मराठी बोलनेकी कोशिश जरूर करेंगे, लेकीन आप लोगही हमसे हिंदीमे बात करते है! यहा मराठी का माहोल नही है.
मला १९६० सालचा एक प्रसंग आठवतो. ठाण्याला मराठी साहित्य संमेलन भरले होते. समीक्षक प्रा. रा.श्री. जोग संमेलनाध्यक्ष होते. संमेलनापूर्वी २ महिने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. पहिल्या रात्री सध्या ठाण्याच्या क्लॉक टॉवरपाशी जी भाजी मंडई आहे तेथे त्या वेळी मैदान होते व त्यावर रात्री ९ वाजता, ‘संयुक्त महाराष्ट्राचे स्वगत आणि स्वागत’ हा परिसंवाद होता. त्यात त्या वेळचे बेळगावचे आमदार बा.रं. सुंठणकर म्हणाले, ‘मी ज्या ज्या वेळी कर्नाटकाच्या विधानसभेत बेळगाव महाराष्ट्रात घाला अशी मागणी करतो, तेव्हा तेव्हा आमचे मुख्यमंत्री बी.डी. जत्ती सांगतात, तुमच्या मराठी साहित्यिकांनी आम्हाला लिहून दिले आहे, की बेळगाव कर्नाटकातच राहू दे. आज आता या परिसंवादाचे अध्यक्ष दत्तो वामन पोतदार यांना मी विचारू इच्छितो, की हे काय आहे?’ आणि मग जेव्हा दत्तो वामन पोतदार बोलायला उभे राहिले, तेव्हा श्रोते त्यांना बोलू देईनात. मग पोतदार रागावले. म्हणाले, ‘ज्या कागदावर ते लिहून दिले तो कागद माझ्या फायलीला आहे, त्यांना कशाला मागता? १९४६ साली बेळगावला शिवराम परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात भौगोलिक प्रांतरचनेचा मुद्दा होता. त्याला अनुलक्षून आम्ही लोक म्हणालो, बेळगाव कर्नाटकात घाला. त्यावर माझी सही आहे. पण, आज तुमचा मुद्दा आहे, भाषिक प्रांत रचनेचा आणि मला तुम्ही मराठी भाषेचा अभिमान शिकवता? मराठीचे विद्यापीठ व्हावे, म्हणून आम्ही खस्ता खाऊन पुणे विद्यापीठाची स्थापना केली. १९१० साली इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून आम्ही जुने कागदपत्र जमा केले. तुम्ही चहाचे दुकान टाकता आणि त्याला ‘अमृततुल्य टी हाउस’ म्हणता. हा तुमचा मराठीचा अभिमान? तुम्ही केस भादरायचे दुकान काढता आणि त्याला ‘हेअर कटिंग सलून’ म्हणता. हा तुमचा मराठीचा अभिमान? आणि असे त्यांनी सट्ट्यावर सट्टे मारले आणि सभा ताब्यात घेतली. जे श्रोते त्यांची हुर्रे करीत होते, त्यांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय आहेत. रोज आपण मराठी काही वाचतो का? दरमहा एकतरी मराठी पुस्तक विकत घेतो का? मुलाबाळांना मराठीत बोला असा आग्रह धरतो का? दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम पाहतो का? आपल्या दारावरची पाटी मराठीत आहे का? मराठी नाटके आणि चित्रपट पाहतो का? बोलण्यात सहजी येणारे इंग्रजी शब्द टाळतो का? महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परभाषक मित्राशी मराठीत बोलतो का? उपाहारगृहात पदार्थांची मागणी मराठीत करतो का? मराठीत सही करतो का? मराठीत काही लिखाण करतो का? असे अनेक उपाय आता करायला हवेत.

Web Title: To understand the language of the English language ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.