उस्मानाबादमध्ये ‘ऊस शेतीच्या पलीकडे’ उपक्रम
By admin | Published: December 6, 2015 02:20 AM2015-12-06T02:20:12+5:302015-12-06T02:20:12+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याअभावी शेतीपुढे मोठे संकट उभे राहिल्याने कमी पाण्यावरील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागाच्या ‘ऊस शेतीच्या पलीकडे’
- विशाल सोनटक्के, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याअभावी शेतीपुढे मोठे संकट उभे राहिल्याने कमी पाण्यावरील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागाच्या ‘ऊस शेतीच्या पलीकडे’ उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी अन्य पीक घेण्यास प्राधान्य दिले आहे.
मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. भूगर्भातील पाणीपातळीतही अनेक ठिकाणी सुमारे १५ मीटर एवढी घटली आहे. मात्र, त्यानंतरही नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी उसाच्या मागे लागल्याचे चित्र दिसून येत होते. भविष्यात येथील शेतीच उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने ‘ऊस शेतीच्या पलीकडे’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
कळंब तालुक्यातील आंदोरा येथील दिलीप तांबारे यांनी त्यानंतर पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. तांबारे यांच्याकडे यापूर्वी ऊस तसेच टरबूज होता. यंदा मात्र त्यांनी उसाचे क्षेत्र कमी केले. टरबूजही बाजुला करून तेथे तुरीची लागवड केली. महिन्यातून एकदा पाणी देऊनही तुरीचे क्षेत्र हिरवेगार आहे. तीन एकर क्षेत्रात अंदाजे ४५ ते ५० क्विंटल तूर निघेल असा त्यांचा अंदाज आहे.