बोधीवृक्षाखालील संबोधीज्ञान
By Admin | Published: May 13, 2014 08:18 PM2014-05-13T20:18:33+5:302014-05-14T01:51:34+5:30
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. त्यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपर्येचा मार्गर्ही अनुभवला.
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. त्यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपर्येचा मार्गर्ही अनुभवला. मात्र, वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले. दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग त्यांना सापडल्याने ही पौर्णिमा बुद्धपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानतेचा पुरस्कार करणारा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधीवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्त झाले. म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दु:ख पसरलेले आहे, या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.
दु:ख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वत:ला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.
ज्या ज्या घटनेला एखादे कारण आहे ती घटना ते कारण नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते, हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दु:खाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.